गारपीटीमुळे 11 जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित : पांडुरंग फुंडकर
शनिवारी व रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश काल कृषीमंत्र्यांनी दिले होते. काल या बाधित जिल्ह्यामध्ये कृषी अधिकार्यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन व कृ षी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित 11 जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अक ोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरुर या तीन तालुक्यातील 42 गावातील 10 हजार 632 हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला याचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड या पाच तालुक्यातील 175 गावांमधील 32 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्यांमधील 23 गावातील 3 हजार 595 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. जालना व परभणी जिल्ह्यातही रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या तीन तालुक्यातील 38 गावांचा समावेश असून 2 हजार 495 हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहु, कांदा व हरभर्याचे नुकसान झाले आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील 36 गावांमधील 8 हजार 509 हेक्टर क्षैत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या पाच तालुक्यामधील 59 गावातील 2 हजार 679 क्षेत्रावरील ज्वारी, गहु, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. उमरगा व उस्मानाबाद या दोन तालुक्यातील 26 गावांमधील 583 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औढा या दोन तालुक्यातील 30 गावांमधील 143 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. अशा पद्धतीने एकूण 1086 गावातील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानाचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.
