Breaking News

… तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील : निर्मळ


प्रवरानगर प्रतिनिधी  :- उद्योगक्षेत्रात महिलांनाही अनेक संधी आहेत. प्रथम कोणता व्यवसाय करायचा, हे निश्चित केल्यानंतर जमीन, इमारत मशिनरी आणि उद्योग उभारणीसाठी लागणारे भांडवल या गोष्टी महत्वाच्या आहेत. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने महिलांना उद्योगासाठी लागणारे बीजभांडवल देण्याची योजना आखली आहे. सहनशीलता, नाविन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गतःच महिलांमध्ये अधिक आहेत. त्यामुळेच गृहविज्ञानशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या तरुणी उदोगक्षेत्रात पुढे आल्या, तर सधन भागात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्कीच थांबतील, असा आत्मविश्वास प्रभात डेअरी उद्योगाचे अध्यक्ष डॉ. सारंगधर निर्मळ यांनी व्यक्त केला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील गृहविज्ञान व संगणकशास्त्र महिला महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने 'ग्रामीण महिलांचे सबलीकरण मुद्दे आणि आव्हाने' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर यांनी स्वागत केले. उपप्राचार्या डॉ. अनुश्री खैरे यांनी प्रास्तविक केले. या चर्चासत्राच्या कार्यवाहक प्रा. रुपाली कोरडे यांनी आभार मानले.