Breaking News

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्ते, संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे पणनमंत्र्यांचे निर्देश


मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्ते, संरक्षण भिंतीचे पुनर्बांधकाम आणि परिसरात शौचालयांची सोय ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मंत्रालयात आज यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगारांचे नेते आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, बाजार समितीचे सचिव शिवाजी पहीणटकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.देशमुख म्हणाले, एपीएमसी ही महाराष्ट्रातील प्रमुख मोठी बाजार समिती आहे. राज्याच्या विविध भागातून येथे मोठ्या प्रमाणात शेतमाल येतो. त्यामुळे शेतकरी, माथाडी कामगार यांची येथे असलेली मोठी रेलचेल पाहता चांगल्या पायाभूत सुविधा असणे गरजेच्या आहेत. बाजार समिती आवारातील रस्ते, संरक्षण भिंत, सार्वजनिक मुताऱ्यांची स्वच्छता आदी कामे निविदा काढून कंत्राटदारांकडून सुरु करण्यात आली होती. पण ही कामे मध्येच खोळंबली असून ती तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.