Breaking News

नांदेडच्या नदाफ इजाज अब्दुल रौफला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार


नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ याला यंदाचा (वर्ष 2017) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. देशातील 18 बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ इजाज अब्दुल रौफचा समावेश आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष गीता सिद्धार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 जानेवारी 2018 रोजी या शूर बालकांना गौरविण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील पार्डी (मक्ता) येथील इजाज अब्दुल रौफने धाडस दाखवून 2 मुलींना तलावात बुडताना वाचविले, त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 30 एप्रिल 2017 ला पार्डी गावातील काही महिला व मुली येथील बंधाऱ्‍यावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यातील एका मुलीचा पाय घसरून ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणीने पाण्यात उडी घेतली. मात्र, 2 हजार फूट लांब, 60 फूट रूंद आणि 20 फूट खोल अशा बंधाऱ्‍यात तीही बुडायला लागली. हे चित्र पाहून दोन अन्य मुलींनी बुडणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या. बुडणाऱ्या मुलींचा आवाज ऐकून लोक तलावावर मदतीसाठी गेले. यावेळी शेताकडे निघालेल्या इजाज अब्दुल रौफने बंधाऱ्‍या जवळील लोकांचा जमाव बघत तिकडे धाव घेतली. त्याने प्रसंगावधान व धाडस दाखवून पाण्यात उडी घेतली. 20 फूट खोल पाण्यात तो मुलींचा सतत शोध घेत राहिला व त्याने यातील तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण वाचवले. दुर्दैवाने यातील दोन मुलींचा मृत्यू झाला.नदाफ इजाज अब्दुल रौफ हा पार्डी येथील राजाबाई विद्यालयात १० व्या वर्गात शिकत असून भारतीय लष्करात रूजू होऊन देशाची सेवा करायची आहे असे त्याने सांगितले.