Breaking News

दखल - शिक्षणमंत्र्यांचं अगाध ज्ञान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं पौराणिक संदर्भ देताना विज्ञानाला गौण ठरवितात आणि वैज्ञानिकांच्या कामाचं महत्व भाषणाच्या ओघात अनवधानानं का होईना कमी करतात, तिथं अन्य नेत्या, मंत्र्यांकडून समंजसपणाची अपेक्षा तरी कशी करायची, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यातही ज्यांच्या शैक्षणिक पदव्याचं जिथं वादाला निमंत्रण देतात, तिथं त्यांच्या ज्ञानाबद्दल वाद निर्माण झाला नाही, तरच आश्‍चर्य मानावं लागेल. मेंदूप्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया भारतात झाल्याचा दाखला मोदी यांनी दिला होता. त्याचं उदाहरण त्यांनी गणपतीच्या मानेवर हत्तीचं डोकं बसविल्यांचं दिलं होतं. असं पंतप्रधानच बोलायला लागले, तर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी वादग्रस्त विधानं केली, तरी त्यामुळं त्याची फारशी चर्चा होत नाही. त्यात काही पत्रांवरील मजकूर शिक्षणमंत्री विनोद यांनी वाचला नसेलही; परंतु त्यांची त्यावर सही आहे. त्यामुळं त्यांना त्याची जबाबदारी टाळता येणार नाही.

तावडे यांच्या खात्यातील वादग्रस्त खरेदी, त्यांच्यावर झालेले वेगवेगळे आरोप यामुळं त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं असलं, तरी त्यांच्याकडं वैद्यकीय शिक्षण हे महत्त्त्वाचं खातं काढून ते गिरीश महाजन यांना दिलं, हे विसरता येणार नाही. तावडे यांची पाठराखण मुख्यमंत्र्यांना करावी लागली, ती केवळ मोदी यांचा वरून आदेश आल्यामुळं. अन्यथा, फडणवीस यांनी त्यांना सांभाळलं नसतं. सातत्यानं वादग्रस्त विधानं करायची आणि पूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली, की नाही, हे पाहण्याअगोदर नवीन आदेश काढायचे, ही त्यांची कार्यपद्धती झाली. शिक्षकांत त्याचबरोबर पालकांतही त्यांच्या धरसोड धोरणामुळं नाराजी आहे.


गेल्या वर्षी निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चक्क वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं होतं. त्यामुळं त्यांना मोठया टीकेचा सामना करावा लागला होता. पुण्यातील साधना ट्रस्टच्या पत्त्यावर हे पत्र पाठवण्यात आलं होतं. या पत्रावर तावडे यांची आहे. रा. ग. जाधव यांचं निधन झालं, त्या वेळीही तावडे यांनी शोकसंदेश पाठवला होता. ज्या व्यक्तीच्या निधनाबद्दल आपण शोकसंदेश पाठवितो, त्याच व्यक्तीच्या निधनानंतर एक वर्षानं त्यांना वाढदिवसाच्या श्ाुभेच्छा देतो, हे त्यांच्या आणि शिक्षण विभागाच्या लक्षात आलं नाही का? मुंबई विद्यापीठाच्या निकालाबाबत तारीख पे तारीख देऊनही निकाल वेळेत लावता आले नाहीत, त्यामुुळे खरं तर कुलगुरूंबरोबरच शिक्षणमंत्रीही नापास झाले! 

आदित्य ठाकरे यांनी तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कुलपती सी. विद्यासागर राव कुलगुरूंना घरी पाठवितात आणि हक्कभंग करूनही तावडे यांना वाचवितात, यावरून तावडे यांचं महत्त्त्व अधोरेखित होतं. राज्यातील जवळपास निम्मे-अर्धे पीएच. डी धारक संशोधन करून नव्हे, तर कॉपी पेस्ट करुन पीएच. डी मिळवतात, असं धक्कादायक वक्तव्य तावडे यांनी केलं होतं. खरं तर कॉपीपेस्ट करून पीएच. डी. मिळवणं हा फौजदारी गुन्हा आहे. शिक्षणमंत्र्यांना अशा प्राध्यापकांची माहिती असेल, तर त्यांनी रीतसर अशा प्राध्यापकांविरोधात गुन्हे दाखल करायला पाहिजेत. तसं न करता त्यांना पाठिशी घालून त्यांना पगारही चालू ठेवणार्‍या शिक्षणमंत्र्यांचाही त्यात तेवढाच दोष आहे. पीएच. डी. ही कुठं पˆाचार्य होण्यासाठी तर कुठं पगारवाढीसाठी आहे. यात संशोधन कमी आणि कॉपी पेस्टच जास्त, असं तावडे यांनी म्हटलं होतं.

कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळा बंद होणार, की नाही, याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. शिक्षण सचिव नंदकुमार एकीकडं शाळा बंद होणार असल्याचं सूतोवाच करीत असताना तावडे मात्र ही फक्त अफवा असल्याचं सांगतात. त्यावरून दोन प्रश्‍न निर्माण होतात. त्यापैेकी एक म्हणजे शिक्षण विभाग तावडे चालवितात, की नंदकुमार? आणि दुसरा प्रश्‍न म्हणजे नंदकुमार यांचं खरं मानायचं, की तावडे यांचं? कमी पटसंख्या असलेल्या निकषांवर राज्यभरातील तेराशे शाळा बंदचा निर्णय झाला असतानाच आता तब्बल 80 हजार शाळा बंद होणार, असं वक्तव्य शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी केलं होते. यावर तावडे यांनी प्रतिक्रिया देत, असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक निर्णय होत आहेत. मात्र, हे निर्णय शिक्षण सचिव हेच जाहीर करत आहेत. शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण असो की शाळा बंद करण्याचा निर्णय; या सार्‍यावर नंदकुमार यांची छाप दिसून येत आहे. अर्थात अशा निर्णयांचा राजकीय फटका बसण्याचा धोका असल्यामुळं तावडे या अशा वादग्रस्त निर्णयांपासून स्वतःला दूर ठेवत आहेत का, असा प्रश्‍न या निमित्तानं उपस्थित होत आहे. 

वादग्रस्त ठरलेले निर्णय सचिवांच्या माध्यमातून जाहीर करून त्यावरील प्रतिक्रियांचा अंदाज घेण्यासाठी तर ही खेळी नाही ना, अशीही चर्चा होत आहे. असा कोणताच निर्णय किंवा धोरण ठरले नसेल आणि ते सचिवांनी परस्पर जाहीर केले असेल, तर सचिवांवर कारवाईचा आग्रह धरणार का, या प्रश्‍नाचं उत्तर तावडे यांनी द्यायला हवं. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पत्राला प्रतिसाद देताना तावडे यांचे अज्ञान पुन्हा जगासमोर आलं. शिक्षण विभागाचं ऐंशी हजार शाळा बंद करण्याचं कोणतेही धोरण नाही. याबाबतचं स्पष्टीकरण देताना तावडे यांनी अनेक महापुरुषांच्या शिक्षणक्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला. छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव देशमुख यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारं उघडली, या वाक्यानं आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

खरं तर कर्मवीर भाऊराव पाटील असं त्यांना म्हणायचं असावं. त्यानंतर त्यांना पंजाबराव देशमुख यांचं नाव घ्यायचं असावं; परंतु पाटील आणि पंजाबराव ही नावं गळाली तसंच अर्धविरामानं घोळ केला असावा. तावडे यांच्याकडं शिक्षणमंत्री तसंच सांस्कृतिक मंत्रालय आणि मराठी भाषा विभागाचाही कार्यभार आहे. तरीही तावडे यांच्या पत्रात गेल्या काही घटनांमाध्ये सातत्यानं चुका दिसून आल्या होत्या. शिक्षणमंत्र्यांच्या या अज्ञानाचा समाचार घेत सोशल मिडियावर सेव्ह स्कूल या हॅशटॅगने बातम्या दिल्या जात आहेत. नवीन शिक्षण धोरणाच्या संदर्भात केंद्राला अहवाल पाठवताना मागासवर्गिर्यांच्या शैक्षणिक सवलती संपवून टाकण्याची विपरीत शिफारस शिक्षणमंत्र्यांनी केली होती. ते लक्षात येताच तो सगळा अहवालाच मुख्यमंत्र्यांनी रद्द करून टाकला आणि पुढचा वाद टाळला.

राजस्थानच्या शिक्षण विभागानं थोरांच्या ओळखीच्या पुस्तकात बलात्कारी आसाराम बापूंचा उल्लेख केला होता. हल्दीघाटाच्या लढाईचा तसंच अन्य ऐतिहासिक संदर्भ बदलायला निघालेल्या राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांना काहीही बदलणं शक्य आहे. वैज्ञानिक संदर्भही ते बदलू शकतात. आतापर्यंत विज्ञानात सातत्यानं आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटननं लावला असं शिकविलं जात होतं; परंतु राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी गुरुत्त्वाकर्षणाचा शोध न्यूटननं नव्हे, तर ब्रम्हगुप्त यांनी लावल्याचंं म्हटलं आहे. यापूर्वी ही देवनानी वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत आले होते. मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी त्यांना तशी समजही दिली; परंतु ते त्यांचं अगाध ज्ञान पाजाळत असतात.