Breaking News

खराब झालेले राष्ट्रध्वज तहसील, जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत - दीपेंद्रसिंह कुशवाह

मुंबई : राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून सर्व राष्ट्रीय कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दिवशी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास बंदी आहे. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये,राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर मैदानात,रस्त्यावर व इतर ठिकाणी इतस्ततः पडलेले खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तहसील वा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे.


गृह विभागाने 1 जानेवारी 2015 रोजी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून प्लॅस्टिकच्या व कागदाच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले, खराब झालेले, माती लागलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहिता 2002 व राष्ट्रीय अवमान कायदा 1971 मध्ये तरतूद केलेली आहे.
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन तसेच महाराष्ट्र दिन या समारंभावेळी स्थानिक जनतेमार्फत राष्ट्रप्रेम दर्शविण्यासाठी छोटया-छोटया राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 कलम 2 नुसार कारवाई करण्यात येते. काहीवेळा समारंभात वैयक्तिक वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज समारंभानंतर इतस्तत: रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात. हे दृश्य राष्ट्र प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने असे खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज वापरानंतर त्याचा योग्य तो मान राखून ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार सन्मानपूर्वक नष्ट करणे आवश्यक असते. यासाठी तसेच प्लॅस्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर एक आणि अंधेरी, बोरिवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुकास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

अशाप्रसंगी रस्त्यात पडलेले, इतस्तत: विखुरलेले खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था (एनजीओ) तसेच इतर संघटनांना देण्यात आलेले आहेत. नागरिकांनीही असे राष्ट्रध्वज एनजीओ किंवा इतर संघटनांकडे सुपूर्द करावेत. या एनजीओ किंवा इतर संघटनांनी असे राष्ट्रध्वज तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.