Breaking News

ग्रामपंचायतीच्या गावगाडयात कार्यकर्त्याला महत्व : कोल्हे

कोपरगांव / प्रतिनिधी : -ग्रामपंचायतीचा गावगाडा चालवितांना जनता आणि नेता यांच्यातील कार्यकर्ता हा महत्वाचा दुवा आहे. त्यांच्या माध्यमातून नेत्याला तळागाळापर्यंत पोहोचता येते. त्यातून जिल्हा परिषद पंचायत समिती शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना देता येते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या गावगाडयात कार्यकर्त्याला महत्व प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील ब्राम्हणगांव, जवळके वारी, कान्हेगांव कुंभारी, बोलकी, वाकडी आणि धनगरवाडी या आठ ग्रामपंचायतीत भाजपाचे ४४ सदस्य व चार ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडून आले. त्याबद्दल आ. कोल्हे यांचा येथील संजीवनी कार्यस्थळावर शनिवारी {दि. १३} सत्कार करण्यात आला. यावेळी तीळगुळ वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते.

याप्रसंगी सर्वश्री दत्तात्रय कोल्हे, संजीवनीचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, माजी सभापती सुनिल देवकर, मच्छिंद्र टेके, माजी प्रतोद केशव भवर, गणेशचे संजय शेळके, बाजार समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब गव्हाणे आदींसह संजीवनी कारखान्यांचे सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी प्रास्तविक केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, डॉ. लभडे, माजी सभापती सुनिल देवकर, मच्छिंद्र टेके यांची भाषणे झाली. 

आ. कोल्हे पुढे म्हणाल्या, गेल्या साडेतीन वर्षांत युती शासनाच्या माध्यमातून मतदारसंघासाठी करोडो रूपयांचा निधी आणून विकास कामे मार्गी लागली आहेत. त्यात प्रामुख्याने बजेट अंतर्गत रस्त्यांसाठी ११ कोटी तर केंद्रीय निधीतून १२ कोटी ८९ लाख रूपये उपलब्ध करून कामे सुरु केली आहेत. मात्र विकासकामात ‘दुस-याची कढी अन धाऊ धाऊ वाढी’ अशी विरोधकांची गत झाली आहे. राजकारणात संकुचित विचार नको. जाती जातीतील संघर्ष सर्वसामान्यांना परवडणारा नाही. बिपीन कोल्हे, की म्हणाले, की ग्रामपंचायतीत निवडून आलेले सरपंच सदस्यांनी गांव विकासावर प्रामुख्याने भर द्यावा. ब्राम्हणगाव, चांदेकसारे येथे नव्याने वीज उपकेंद्र प्रस्तावित आहेत. गांवच्या समस्या सांगा. त्याचा आराखडा तयार करा. नवोदित सरपंचांना जेथे जेथे आवश्यक असेल तेथे सहकार्य करू. शेवटी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी आभार मानले.