कमला मिल अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा - रामदास आठवले
मुंबई, - कमला मिल येथील पब आणि हॉटेल ला लागलेल्या आगीत 14 निरपराधांचा बळी गेला . या दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात रिपाइं सहभागी आहे.मृतांच्या कुटुंबियांना सांत्वनपर आर्थिक मदत शासनाने द्यावी तसेच अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आज केली. आठवलेंनी लोअर परेल च्या कमला मिल अग्निदुर्घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
कमला मिल अग्निकांडाच्या कटू अनुभवातून प्रशासनाने धडा घ्यावा आणि या पुढे पब आणि हॉटेल परवानगी देताना अग्नीसुरक्षेची खबरदारी घ्यावी तसेच अश्या पबना परवानगी देण्याबाबत पुनर्विचार करावा. कमला मिल अग्निकांडाआधी साकिनाका येथे लागलेल्या आगीत गरीब मजुरांचे बळी गेले. त्या दुर्घटनेतून प्रशासनाने सावधान न होता अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे साकिनाका येथील गोदामाला लागलेल्या आगीची आणि कमला मिल येथील अग्निकांडाची सखोल चौकशी करावी. दोन्ही ठिकाणी आगीत बळी गेलेल्यांच्या कुटुं बियांना सांत्वनपर आर्थिक मदत शासनाने करावी अशी रिपाइं ची मागणी असल्याचे आणि त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आठवले म्हणाले.