केंद्राकडून राज्याला निधी मिळण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक येथील सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, सर्वपक्षीय खासदार, मुख्य सचिव सुमित मल्लिक यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राचे केंद्र शासनाकडे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत याचा पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक घेण्यात येते. यापूर्वी तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्यातील खासदारांनी आतापर्यंत 561 मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी 431 मुद्यांबाबत कृती अहवाल सादर करण्यात आला आहे. जे काही प्रलंबित मुद्दे आहेत त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन ते सोडविण्यात येतील.
