Breaking News

प्रज्ञा वाळकेंना सेफ करून मुख्यमंत्री बांधकामचे टार्गेट!

इमारतीच्या डेब्रीजसोबत अपहाराचे डेब्रीजची विल्हेवाट लावण्याचा कट


मुंबई/विशेष प्रतिनिधी : मनोरा आमदार निवास फेब्रूवारी 2018 मध्ये जमीनदोस्त होणार हे गृहीत धरून केलेल्या भ्रष्टाचाराला दिलेला अंजाम पचविण्यासाठी खोट्यांची मालिका सादर करण्याचा द्रविडी प्राणायाम शहर इलाखा विभागात सुरू आहे. प्रज्ञा वाळके या संशयित कार्यकारी अभियंत्यांच्या बचावासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्ट फौज क्रियाशील असून अपहारासंदर्भाच्या मुळ तक्रारीला सोयीस्करपणे बगल देत मनोरा आमदार निवास इमारत कशी धोकेदायक आहे हेच बिंबवण्यात या प्रवृत्ती हशील मानत आहेत. प्रज्ञा वाळके यांनी केलेला कोट्यावधीचा अपहार किंवा त्यासंदर्भातील अहवाल दडवून मुख्यमंत्र्यांची पध्दतशीरपणे दिशाभुल केली जात आहे.

आमदार निवासासाठी मनोरा ही इमारत 1985 साली बांधण्यास सुरूवात झाली. 1994 मध्ये काम पुर्ण झाले आणि फेब्रूवारी 2018 मध्ये ही इमारत राहण्यास अयोग्य म्हणून पाडण्याचा निर्णय झाला. म्हणजे केवळ तेवीस वर्षात ही इमारत अनफिट ठरवून ती पाडली जाणार. इमारत पडल्यानंतर पाडलेल्या डेब्रीजसोबत भ्रष्टाचाराच्या डेब्रीजचीही विल्हेवाट लावता येईल या चाणाक्ष दुरदृष्टीतून शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी मनोरातील अनेक आमदारांच्या कक्षात बोगस कामे दाखवून कोट्यावधीचा अपहार केला.हा अपहार उघड झाल्यानंतर चौकशीचा फार्स झाला. तोही वारंवार मागणीचे दडपण आल्यानंतर. चौकशीचा फार्स उरकल्यानंतर अहवाल मात्र जाणीवपुर्वक दडविला गेला.

अहवाल दडपणे, प्रज्ञा वाळके यांच्यावर कारवाई न करणे या अजेंड्यावर काम करण्यात व्यस्त असलेल्या सार्वजनिक बांधकाममधील भ्रष्ट प्रवृत्तींनी समांतर पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. प्रज्ञा वाळके यांच्यावर अपहाराचा ठपका सिध्द झाला असतांना त्यांना दंडित करण्याऐवजी त्यांना सेफ करून बांधकाम विभाग मुख्यमंत्र्यानाच टार्गेट करीत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.


गंभीर अनुत्तरीत मुद्दे
इमारतीचे बांधकाम नक्की कुणी केले?
अपहारासंबंधी अहवाल देण्यास टाळाटाळ कोण करते? कशासाठी?
मनोरा पाडून आमदारांची व्यवस्था कुठे होणार?
कायदे मंडळाच्या सदस्यांना हद्दपार करण्याचा डाव? 
लोकप्रतिनिधींचा निवारा की विस्थापितांची निर्वासीत छावणी