Breaking News

सांगली बंदला हिंसक वळण

सांगली, दि. 04, जानेवारी - भीमा- कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला बुधवारी सांगली शहरासह जिल्ह्यात हिंसक वळण लागले. श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या गडकोट मोहिमेचा डिजीटल फलक उतरविण्यात यावा, या मागणीसाठी येथील मारूती चौकात जमलेल्या विविध दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करीत दगडफेक केली. त्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या या जमावाने गणपती मंदिरासमोरील सात दुकानांसह दहा चारचाकी वाहनांची मोडतोड केली, तर अनेक बँकांची एटीएम केंद्र, कापड दुकाने व हॉटेल्सच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते व दलित संघटना समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र सांगली जिल्हा पोलिसांनी वेळीच अटकाव करीत या दोन्हीही गटांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला. 


संभाजी भिडे व हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार सांगली शहरातही बंद पाळण्यात आला. भीमा- कोरेगावप्रकरणी समाजकंटकावर कारवाई करावी, यासाठी विविध दलित संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील मुख्य बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक जमले होते. 

या घटनेचा अनेक कार्यकर्त्यांनी निषेध करीत संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांना निवेदन देण्याचा व या घटनेचा निषेध करीत सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून सांगली बंदची हाक देण्यासाठी या जमावाने दुचाकी मोटारसायकल फेरी काढण्याचा निर्णय घेतला. मात्र यातील एक जमाव मारूती चौकात आला व त्या जमावातील काहीजणांनी त्याठिकाणी असलेला गडकोट मोहिमेचा फलक तातडीने काढून टाकावा, या मागणीसाठी ठिय्या मारला.