Breaking News

राज्यात प्राध्यापकांच्या साडेनऊ हजार जागा रिक्त

पुणे : राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात 9 हजार 511 प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. सध्या प्राध्यापकांच्या भरतीस बंदी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापकांची भरती उठवावी, अशी शिफारस राज्य शासनाकडे केली आहे. रिक्त पदांमुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्य शासनाने 25 मे 2017 पासून प्राध्यापकांची भरती बंद केली आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयात अनेक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. 


राज्यात एकूण 1 हजार 172 अनुदानित महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात प्राध्यापकांची 9 हजार 511, तर शिक्षकेतर कर्मचार्‍यांची 8 हजार 798 पदे रिक्त आहेत. एकूण 18 हजार 309 पदे महाविद्यालयात रिक्त आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी दिली. तासिका तत्वावरील मानधनही वेळेवर दिले जात नाही. त्यांच्या मानधन वाढीचा प्रस्तावही प्रलंबित आहे. प्राध्यापकांची भरती बंद असल्याने महाविद्यालयांपुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रिक्त पदांमुळे महाविद्यालये चालविणे कठीण झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत प्राध्यापकांच्या नियुक्तीस परवानगी मिळावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर धनराज माने म्हणाले, प्राध्यापकांच्या भरतीस मुभा मिळावी, याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यावर राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय होईल. मात्र राज्यात अनुदानित महाविद्यलायात शिक्षक व शिक्षकेतरांची रिक्त पदांची संख्या 18 हजार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.