Breaking News

नाशिक शहर गुन्हे शाखेने बांधल्या मोबाईल चोर टोळीच्या मुसक्या


नाशिक : आठवडे बाजार तसेच गंगाघाटावर भाजीबाजारात खरेदी करण्यासाठी येणार्‍या भोळ्या भाबड्या ग्राहकांची दिशाभूल करून मोबाईल हातोहात लांबविणार्‍या टोळीच्या नाशिक शहर पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शहर गुन्हे शाखेच्या युनीट एकने ही कारवाई केली असून तब्बल चार लाख तीन हजार रूपये किंमतीचे 35 महागडे मोबाईल जप्त केले आहेत. शहरातील आठवडे बाजारासह गंगाघाटावरील भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे मोबाईल चोरणार्‍या पंचवटीतील दोघा सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार आहे़ दरम्यान, या तिसर्‍या साथीदाराच्या अटकेनंतर आणखी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे व पोलीस शिपाई स्वप्निल जुंद्रेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई झाली. पोलीसांनी केलेल्या कारवाईत संशयित राहूल भिकन कासार (19, रा.मायको दवाखाना परिसर, पंचवटी) व विकी उर्फ टेमर्‍या विजय भुजबळ (19, रा.मोरेमळा, हनुमानवाडी, पंचवटी) हे दोघे ठक्कर बाजार परिसरात मोबाईल विकण्यासाठी आले असता त्यांना सापळा लावून अटक केली़ तर त्यांचा तिसरा साथीदार सोनल उर्फ चिवड्या दशरथ बागड हा फरार झाला़ पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर गोदाघाटावरील भाजीबाजारात तब्बल 35 महागडे मोबाईल चोरल्याची कबुली दिली़ त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच 15 ईव्ही 8582) व मोबाईल असा सुमारे 4 लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़. या दोघा सराईत गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या मोबाईलचे आयएमईआय नंबरची यादी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात लावण्यात आली आहे़ ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीस गेलेले आहेत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा़, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.