पगारी शिक्षक रंगलेय खासगी क्लासेसमध्ये! शिक्षण विभाग मूग गिळून गप्प
शहरात विद्यार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. यात बाहेरून गावच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची सुविधा असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल शहरात शिक्षण घेण्याकडेच असतो. इयत्ता १० वी, १२ वीतील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या सर्वत्र खाजगी क्लासेसचे वारे वाहत आहे. त्यामुळे संगमनेर शहरही त्याला अपवाद नाही. संगमनेर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी क्लासची सोय उपलब्ध आहे. खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहावी व बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शैक्षणिक वाटचालीतले हे दोन वर्षे निर्णायक टप्प्याचे असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालकही जागृत असतात. आपला पाल्य कोठेही कमी पडू नये. याकडे पालकांचा कटाक्ष असतो. यामुळे जवळपास ९० टक्के विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या खासगी क्लासमध्ये शिक्षण घेताना आढळतात. शहरात अधिकृत आणि अनधिकृत प्रकारचे खाजगी क्लास घेतले जातात. शहरातील चौकाचौकात वेगवेगळ्या प्रकारच्या खाजगी क्लासचे बोर्ड झळकत आहेत. या क्लासच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात असले तरी विद्यार्थ्यांकडून मोठ्य़ा प्रमाणात शुल्क आकारले जात आहे. वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयांत नोकरी करणाऱ्या शिक्षकांना खाजगी क्लास चालविता येत नाही. त्यांचे हे कृत्य बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. शहरातील एका नामांकित क्लास चालकाने या कायद्याच्या भितीने स्वतःचा क्लास बंद केला आहे. असे असले तरी काही ठिकाणी बिनधास्तपणे असे क्लास चालविले जात आहेत. शिक्षण विभागाने या क्लासचालकांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
