Breaking News

निर्यात उद्योग वाढीस लागणे आवश्यक - सुभाष देसाई


जागतिक बाजारपेठेत निर्यात उद्योगात देशाचा वाटा हा दोन टक्क्याहूनही कमी आहे, याचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात घेऊन निर्यात उद्योग वाढीस लागणे आवश्यक असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे सांगितले. आयएएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने एक्स्पोर्ट प्रमोशन ॲण्ड इंटरनॅशनल ट्रेड या विषयावर हॉटेल ताज येथे एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आयएएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. ललित कनोडिया, निर्यात क्षेत्रातील उद्योजक रवी पोद्दार, राजेश मेहता, राज नायर उपस्थित होते. निर्यात उद्योगातील संधी आणि आव्हाने यावर या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.

श्री. देसाई पुढे म्हणाले, जगातील अनेक देश आज भारतातील बाजारपेठेकडे आकृष्ट होत आहेत. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आयात होत असते. मात्र त्याच वेळी जागतिक बाजारपेठेत देशातून होणारी निर्यात हे केवळ १.७ टक्के म्हणजे दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे, यावर गांभीर्याने कृती करण्याची वेळ आली आहे. आज इथे ही परिषद आयोजित करुन आपण याची सुरुवात केली आहे. या परिषदेमध्ये व्यक्त होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी केलेल्या सूचनांचे राज्य शासन स्वागत करेल.