Breaking News

शेतकरी प्रश्‍नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : पी साईनाथ


नवी दिल्ली : शेतकरी प्रश्‍नांवर आंदोलने झालीत, मात्र त्या प्रश्‍नांवर संसदेत चर्चा करण्याला वेळ मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, राष्ट्रीय संकटावर राष्ट्रीय स्तरावरच चर्चा हवी, अशी मागणी करत शेतकरी अवस्थेवर संसदेचं अधिवेशन बोलवण्याच्या ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केलेल्या मागणीला, कृषीतज्ज्ञ आणि शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी पाठिंबा दिला आहे. शेतकर्‍यांच्या मुद्यावर पी साईनाथांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबत तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. शेतकरी नेते चंद्रकांत वानखडेंपाठोपाठ आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही पाठिंबा दिला. साईनाथांचे विधान योग्य आणि वास्तववादी आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारला शेतकर्‍यांबाबत काहीही देणे घेणे नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. शेतकर्‍यांच्या मूळ प्रश्‍नाला बगल देण्यासाठी समाजातील काही घटक जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशातले कृषीसंकट खूप मोठे असून दिवसाला 2 हजार शेतकरी संपत आहे. त्यामुळे संसदेचे वीस दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली. अधिवेशनात शेतकर्‍यांनाही व्यथा मांडू द्या असंही साईनाथांनी फनमूद केले आहे.