Breaking News

कांदा उत्पादकांना अनुदान देण्यास राज्य सरकारला अखेर मुहूर्त

मुंबई, दि. 18 - कांदा उत्पादकांना अनुदान देण्यास राज्य सरकारकडून अखेर सुरुवात केली जाणार आहे. घोषणा केल्यानंतर नऊ महिन्यांनी सरकारला अनुदान वाटपाचा मुहूर्त सापडला आहे. 2016 साली खरीप हंगामात ज्या कांदा उत्पादकांचं नुकसान झालं, अशा शेतकर्‍यांना सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केलेल्या शेतकर्‍यांना क्विंटलमागे 100 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
अनुदान देण्यात सरकारकडून मर्यादा आखण्यात आली आहे. ती म्हणजे, जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत अनुदान दिले जाईल. ज्या शेतकर्‍यांनी 200  क्विंटलपेक्षा अधिक कांदा उत्पादन केले आणि विक्री केली आहे, त्यांना त्यातील केवळ 200 क्विंटल कांद्यासाठीच अनुदान मिळेल. राज्यातील 1 लाख 25 हजार  कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदानाचा फायदा मिळणार आहे. या अनुदानासाठी सरकारकडून 48 ते 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय,  अनुदानासाठी शेतकर्‍यांकडून आणखी अर्ज आल्यास, त्यानुसार आणखी तरतुदीचा विचार केला जाईल, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.
अनुदान मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना आधार कार्ड क्रमांक जोडलेले बँक खाते नंबर, सातबारा उतारा इत्यादी कागदपत्रे घेऊन ज्या बाजार समितीत कांदा विक्री  केली असेल, तिथे अर्ज करावा लागेल.