Breaking News

भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्याना सुविधा देण्याची मागणी

शेवगाव ता.प्रतिनिधी - शेवगाव शहरामध्ये शेवगाव तालुक्यातून तसेच पाथर्डी पैठण भागातून आपला भाजीपाला मंडईत विकण्यासाठी शेतकरी शेवगाव शहरामध्ये येत असतात परंतु त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा शेवगाव नगर परिषदेकडून पुरवल्या जात नाहीत परंतु त्यांच्याकडून नगरपरिषदेची कर आकारणी मात्र केली जाते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर आपल्या भाज्या विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढल्याने नगरपरिषदेच्या वतीने त्यांना हक्काची जागा मिळावी तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या कडे केली आहे.

शेवगाव नगरपरिषदेचे कायम स्वरूपी मुख्याधिकारी म्हणून गर्कळ यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे, जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब फटांगरे, भीमराव भडके आदी कार्यकर्त्यांनी मंगळवारी नगरपरिषदेत जावून मुख्याधिकारी गर्कळ यांचे स्वागत केले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी मुख्याधिकारी गर्कळ यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध अडचणी बाबत त्यांच्याशी संवाद साधला. शेवगाव येथील जनता व्यासपीठाच्या समोरील प्रांगणात दैनंदिन भाजी बाजार तर जुन्या बाजार तळ परिसरात आठवडे बाजार भरतो. दैनंदिन भाजी बाजाराची जागा आपल्या मालकीची समजून काही जण ग्रामीण भागातून आपल्या भाज्या विक्री साठी आणलेल्या शेतकऱ्यांना येथे बसण्यास मज्जाव करून पिटाळून लावतात. काही भाजी विक्रेत्यांनी थेट जनता व्यासपीठावर आपले बस्तान बसविल्याने अडचणींच्या समस्येत वाढ झाली आहे. नगरपरिषद प्रशासन भाजी विक्रेत्यांकडून कर पावती आकारते. मात्र त्याप्रमाणात ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यांना संरक्षण व सुविधा मिळत नसल्याने या बाबत नगरपरिषद प्रशासानेने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच आठवडे बाजाराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक भाजी मंडईचे उद्घाटन लांबल्याने सध्या भाजी मंडई पूर्ण असूनही त्याचा वापर सुरु नसल्याने भाजी विक्रेत्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. आठवडे बाजार नेवासा रस्त्याच्याही पुढे सरकल्याने भाजी विक्रेत्यांबरोबरच नागरिकांना सुद्धा विविध अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी जवळपास संपूर्ण दिवसभर वाहतूक कोंडीच्या समस्येने लोक हैराण झाले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने शेतकऱ्यांची तसेच भाजी विक्रेते व नागरिक अशा सर्वांची गैरसोय दुरकरण्याची मागणी करण्यात आली. या बाबत संबंधित विभागासह नगरपरिषदेच्या वतीने तातडीने कार्यवाही करण्याचे मुख्याधिकारी गर्कळ यांनी मान्य केले.