Breaking News

दखल ;- चंद्रकांतदादांचे कन्नड प्रेम!

ज्याच्याकडं पाहुणा म्हणून जातो, त्यांचं कौतुक करण्याची आपली परंपरा असली, तरी कौतुक करतानाही औचित्यभंग होणार नाही, याची दखल पाहुणा म्हणून जाणार्‍यांनी घेतलीच पाहिजे. घरचीचं कधीकौतुक करायचं नाही आणि बाहेरची कशी असली, तरी तिचं कौतुक करायचं, ही वृत्ती असली, तरी या वृत्तीनं घरचीनं घराबाहेर हाकलून देता कामा नये, एवढं तरी गांभीर्य असायला हवं. ते नसलं, तर काय होतं, याचा अनुभव सध्या राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आला आहे. चंद्रकांतदादा यांचं वागणं सातत्यानं वादाला निमंत्रण देणारं असतं. मुख्यमंत्र्यांनंतर मंत्रिमंडळात त्यांचंच स्थान नंबर दोनच आहे, हे खरं असलं, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे निर्णयही तेच परस्पर जाहीर करतात. अन्य पक्षांतील नेत्यांना प्रवेश देण्याचं एक वेळ समर्थन करता येईल. त्यांना पद देण्याचंही समर्थन करता येईल; परंतु हे करताना राज्यात विविध महामंडळांवर नियुक्त करण्याइतके चांगले लोक भाजपत नाही, असं म्हणणं म्हणजे स्वपक्षीयांची लायकी काढण्यासारखंच झालं. मागंही एकदा राज्यातील रस्ते 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. ही मुदत संपून एक महिना झाला, तरी रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत. उलट, उच्च न्यायालयालाच राज्य सरकारकडं विचारणा करावी लागली, की खड्डे दुरुस्त करण्यासाठी सरकारकडं पैसे आहेत, की नाहीत? दादांचं हे असं असतं. मंत्री असले, म्हणजे काहीही आश्‍वासनं द्यायची नसतात. खात्याच्या तरतुदीचा विचार करायचा असतो; परंतु तसं काहीही न करता ते सातत्यानं मनाला येईल, ते बोलतात आणि मग नंतर पश्‍चाताप करण्याची वेळ येते. 

चंद्रकांतदादा महाराष्ट्राचे केवळ महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीच नाहीत, तर त्यांच्यावर अन्य अनेक महत्त्त्वाच्या जबाबदार्‍या टाकण्यात आल्या आहेत. त्यातली एक म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा पˆश्‍न सोडवण्याची जबाबदारी राज्य सरकारनं चंद्रकांतदादांच्या खांद्यावर सोपवली आहे. समन्वय मंत्री म्हणून ते काम पाहतात. महाराष्ट्र व कर्नाटक सीमांप्रश्‍न आणि त्यातील गुंतागुंत चंद्रकांतदादांना माहीत नाही, असं नाही. कर्नाटक सरकार मराठी भाषकांवर किती अन्याय करतं, हे कोल्हापूरचे असल्यानं चंद्रकांतदादांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळं कर्नाटकमध्ये जरी एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेलं, तरी तिथं बोलताना मराठी भाषकांच्या जखमांवर आपण मीठ तर चोळत नाही ना, हे त्यांनी पाहायला हवं होतं. सीमावर्ती भागातील लोकांना शेजारच्या राज्यांतील भाषा येत असतात. चंद्रकांतदादांना ही कन्नड भाषा येते. असं असलं, तरी कन्नड समर्थकांकडून मराठी भाषकांची ज्या पद्धतीनं गळचेपी केली जाते, ते पाहता कन्नड येत असतानाही चंद्रकांतदादांनी मराठीत भाषण केलं असतं, तर ते जास्त चांगलं झालं असतं. कार्यक्रमाच्या आयोजक संस्थेचा गौरव करून त्यांना अतिथीधर्म निभावता आला असता; परंतु चंद्रकांतदादांना मोह आवला नाही. सीमाभागात झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांतदादांनी कन्नड भाषेत गाणं म्हटलं. त्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. सीमाभागात तसंच कोल्हापूर परिसरात चंद्रकांतदादांविरोधात नाराजी निर्माण झाली आहे. त्यातच शिवसेनेचे स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर व दादा यांच्यात विळ्या भोपळ्याचं सख्य. राजेश क्षीरसागर यांनी त्याचं भांडवल केलं नसतं, तरच नवल. याच क्षीरसागर यांनी यापूर्वी चंद्रकांतदादांच्या संपत्तीची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळं आता चंदकांतदादांनी कन्नड भाषेत गाणं म्हटल्याच्या कृतीचा निषेध नोंदवत समन्वय मंत्री पदावरून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात येते आहे. शिवसेनेचे पक्षपˆमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पाटील यांच्या विरोधात आंदोलनाची रूपरेषा ठरवणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

बेळगाव जिल्ह्यात गोकाक इथं सुंदर धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी मुंबई, पुण्याहून पर्यटक जात असतात. या धबधब्याच्या शेजारीच कापडाचा कारखाना आहे. संकेश्‍वर, निपाणी, गोकाक, बेळगाव या भागात मराठी भाषकांचं प्रमाण जास्त आहे. या भागाची महाराष्ट्रात येण्याची गेल्या सात दशकांपासूनची मागणी आहे. गोकाक हा तसा निसर्गरम्य परिसर. तेथील दुर्गादेवीच्या मंदिराच्या उद्घाटनाला चंद्रकांतदादांना बोलवण्यात आलं होतं. तिथं त्यांनी कन्नड अभिनेता राजकुमारचं गीत म्हटलं. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत चंद्रकांतदादांनी ‘हुट्टी दरे कन्नड नलली हुट्टू बेकू’ या गाण्याचे बोल आळवले. या गाण्याचा अर्थ जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे, असा होत असल्यानं चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मराठी भाषा ,अस्मिता यासाठी झगडणार्‍या सीमावासियांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कर्नाटकात विधानसभेची तयारी सुरु असताना भाजपचा प्रचार करण्यासाठीच पाटील यांनी जाणीवपूर्वक हे गीत गायल्याचा सूर आता सीमाभागात उमटतो आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. उत्तर कर्नाटकमध्ये काँग्रेसची स्थिती बरी आहे. तिथं भाजपला फायदा व्हावा, या हेतूनं चंद्रकांतदादांनी हे गीत म्हटल्याचा आरोप आता होत आहे. कन्नड प्रेम दाखवणार्‍या चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मराठी द्वेष्ट्यांच्या सहवासात जाऊन त्यांनी म्हटलेलं गाणं संतापजनक असून ते सीमाभागातील मराठी बांधवाच्या भावनावर मीठ चोळणारे आणि निषेधार्ह आहे. त्यांनी हे गीत गायल्यामुळं महाराष्ट्र सीमा प्रश्‍नांबाबत किती त्यांना कितपत गांभीर्य आहे, हे कळून चुकलं आहे. त्यामुळं पाटील यांची समन्वयक मंत्रिपदावरून हकालपट्टी करून रक्तात मराठी अस्मिता असणारी राजकारण विरहीत व्यक्ती समन्वयक म्हणून नेमणूक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटील या वक्तव्याचा निषेध केला असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना याची कल्पना दिली असल्याचं सांगितलं. समनव्यक मंत्री चंद्रकांत पाटील यांना सीमा भागातल्या मराठी जनतेची कदर नाही. त्यांचं गोकाक येथील वक्तव्य सीमा भागातील मराठी बांधवांचा अपमान करणारे आहे. शिवसेना पक्ष पˆमुखांच्या आदेशानुसार त्यांच्या विरोधात आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहे, असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला आहे. चंद्रकांतदादा आणि दर महिन्याला नवं एक वादळं असं समीकरण झालं आहे.