Breaking News

साबांतील भ्रष्टाचाराविरूध्द आज उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार


शहर इलाखातील भ्रष्ट अभियंत्यांच्या मुसक्या आवळण्याचा आ. वाघमारेंचा निर्धारमुंबई/विशेष प्रतिनिधी । 22 : दुरुस्तीच्या नावाखाली कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळ्के यांनी महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांच्या डोळ्यात धुळ फेकून कोट्यावधीचा अपहार करण्याचा पराक्रम करून देशपातळीवर भ्रष्टाचाराचा ऐतिहासिक निच्चांक केला आहे. या निच्चांकासाठी प्रज्ञा वाळके यांचा यथोचित सत्कार व्हावा म्हणून आ.चरणाभाऊ वाघमारे हे उद्या मंगळवार दि.23 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत, या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर शहर इलाखा साबां विभागातील वाळके कृत अपहाराविरूध्द खर्‍या अर्थाने पोलीसी कारवाई होणार असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या जागृत राज्याच्या तब्बल पन्नास विधानसभा सदस्यांना फसवून कोट्यावधी रूपयांची हेराफेरी करणे साधी, सरळ, सोपी गोष्ट नाही. मात्र शहर इलाखा साबांच्या पुर्व कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी त्यांच्या कार्यकाळात ही किमया करून दाखवली. किमान 50 आमदारांच्या कक्षात कामे न करता कामे केल्याचे खोटे दस्तावेज बनवून 5 करोड रुपयांचा शासकीय निधीचा अपहार करण्याचा पराक्रम करणार्‍या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आजही उजळ माथ्याने साबांत कार्यरत आहेत..हे प्रकरण एवढे गंभीर आहे की सत्ताधारी भाजपाचे आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी या घोटाळ्या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या कडे सतत पाठपुरावा केला. पारदर्शक कारभार च्या मुद्यावर आपण निवडणुका लढलो. जनतेने आपल्यावर विश्‍वास टाकून भरघोस मताने राज्याची सत्ता आपल्या हातात दिली. मनोरा आमदार निवास ही इमारत म्हणजे आमदारांचे शासकीय निवासस्थान याच निवासस्थानी पारदर्शक कारभाराचा दिवसा ढवळ्या खून कार्यकारी अभियंत्यांनी केला देशपातळीवरील अशा प्रकारची ही पहिली घटना. या सरकारच्या आजवरच्या काळातील सर्वात गाजलेला घोटाळा म्हणून या प्रकरणाकडे पाहिले जाते. महाराष्ट्र विधी मंडळात या विषयावर जोरदार चर्चाही झडल्या, परिणाम शुन्य, म्हणूनच सभागृहाबाहेर या प्रकरणाला वाचा फोडून सनदशीर मार्गाने भ्रष्ट कार्यकारी अभियंत्यांच्या नाकात वेसण टोचण्याचा निर्णय आ. चरणभाऊ वाघमारे यांनी घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या मंगळवार दि.23 जानेवारी रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात या अपहाराविरूध्द दाद मागणार आहेत.आ.चरणभाऊ वाघमारे यांचा न्यायव्यवस्थेवर विश्‍वास असून न्यायालयाच्या निर्णयानंतर शहर इलाखा विभागातील भ्रष्ट वाळके टोळीवर सरकारला कारवाई करणे भाग पडेल असे त्यांनी लोकमंथनशी बोलतांना सांगीतले.