Breaking News

उक्षी येथील ‘हत्ती’ कातळखोद शिल्प संरक्षित

रत्नागिरी, दि. 22, जानेवारी - गेली तीन वर्षे कातळ खोदशिल्पांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आज अखेर यश आले. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे आढळलेल्या हत्तीच्या भव्य खोदशिल्पाला संरक्षक कठडा बांधण्यात आला. संशोधक, सरपंच व लोकांच्या सहभागातून या खोदशिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. आता गावात पर्यटन वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.उक्षी गावातील प्रसिद्ध धबधब्यापासून हे शिल्प केवळ दोन किलोमीटवर, तर मुंबई-गोवा महामार्गापासून 25 आणि रत्नागिरी शहरातून 40 किमीवर शिल्परचना आहे. कोकणात प्रथमच ग्रामपंचायत व लोकसहभागातून या खोदशिल्पाचे संरक्षण केले आहे.


रत्नागिरी, राजापूर, लांजा या तीन तालुक्यांतील 43 गावांत 71 ठिकाणी 950 कातळखोदशिल्पे आढळली आहेत. सुमारे दहा हजार ते 35 हजार वर्षांपूर्वीची ही शिल्पे म्हणजे जागतिक वारसा आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने शासनाच्या वतीने पुढाकार घेतला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून उक्षी येथे आज झालेल्या लोक ार्पण सोहळ्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, प्रांताधिकारी अमित शेडगे, ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल विभूते तसेच खोदशिल्पाचे संशोधक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, समन्वयक ऋत्विज आपटे उपस्थित होते. सरपंच मिलिंद खानविलकर व उपसरपंच हरिश्‍चंद्र बंडबे यांनी लोकसहभागातून या कातळ खोदशिल्पाला संरक्षक कठडा बांधला. त्याशेजारी चबुतरा बांधला असून त्यावरून कातळशिल्प व्यवस्थित दिसू शकते. अनुप सुर्वे यांच्या जागेमध्ये हत्तीचे शिल्प आढळले. त्यांनी विनामोबदला ही जागा उपलब्ध करून दिली. जवळच काशिनाथ देसाई यांच्या जागेमध्ये सुमारे पंधरा विविध खोदशिल्पे आहेत. या शिल्पांची साफसफाई करून तेथेही कठडा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उक्षी गाव आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर यायला मदत होणार आहे. उक्षीमध्ये पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठीही गर्दी होते. त्यासोबत कातळशिल्पे पाहण्याची पर्वणी पर्यटकांना मिळणार आहे.