Breaking News

विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी नवीन फिडर सुरु


नेवासा/शहर प्रतिनिधी/- लोहगाव, झापवाडी, पांढरीपूल, मोरेचिंचोरे, वांजोळी या भागांच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी नवीन विद्युत वाहिनी (फिडर) सुरु करण्यात आली. यामुळे या पाच गावांसह औद्योगिक वसाहतीतील विजेचा प्रश्न मिटला आहे. 

लोहगाव, झापवाडी, पांढरीपूल, मोरेचिंचोरे, वांजोळी या परिसरात मागील बऱ्याच दिवसांपासून ओव्हरलोड मुळे लाईटची परिस्थिती अतिशय गंभीर होती. येथील शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने करून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली होती. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सदर प्रश्नाबाबत विशेष लक्ष देऊन यासंदर्भात वरिष्ठांशी पाठपुरावा करून या चारही गावांसाठी स्वतंत्र फिडरची मागणी केली. तातडीने हा प्रश्न सोडवला. शिंगवे तुकाई फाट्यावरील सबस्टेशनमध्ये सोमवार,२९ जानेवारी रोजी या फिडरचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते बटण दाबून शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता दिलीप सोनार, विजय खताळ हे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की , पाण्याचे दुर्भिक्ष असलेला हा भाग या परिसरात रस्ते, विजेसह लोकांच्या अनेक समस्या आहेत. त्यात विजेचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. तसेच या भागातच औद्योगिक वसाहत आल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होत चालला होता. त्यात आपण आता मार्ग काढला असून या नवीन फिडरचा फायदा होत आहे. अधिक फायदा होण्यासाठी या परिसरातील वाड्यावस्त्यांवरती सिंगल फेजचे व नवीन विद्युत रोहित्राचे प्रस्ताव तत्काळ तयार करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी स्थानीक नेते कैलास दहातोंडे, बाबासाहेब खंडागळे, मच्छिंद्र पागीरे, भाऊसाहेब खंडागळे, शिवाजी येळवंडे, भास्करराव जाधव, शरद तोडमल, संतोष वाघ, शरद वाघ, नवनाथ साबळे, गोरख खंडागळे, रामभाऊ गायतळे, बाळासाहेब तवले, किशोर येळवंडे, पांडूरंग वाघ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.