माध्यमातील डेटूडे चिंधीचोरी अन् स्व-आरती लंकेश्वरी
अहमदनगर : व्यवस्थेवर नजर रोखून समाजहिताला बाधित करणार्या चिंधी चोरांचा बुरखा फाडणे हे माध्यमांचे कर्तव्य. मात्र माध्यमांमधील काही ‘बाळबोधीं’मुळे समाजाप्रती असलेल्या कर्तव्याच्या चिंध्या झाल्यात. एका बाजूला माध्यमांमध्ये वावरतांना लोकमताचा बाजार मांडून ध्येयाचा लिलाव करणारे लंकेश्वर स्वारतीत मश्गूल झालेले दिसतात. तर दुसरीकडे सकाळ संध्याकाळ आम्हीच खरे चा जप करून डे -टूडे समाजाला बोधामृत पाजण्यात धन्यता मानत आहेत.
सध्या या दोन प्रवृत्तींमध्ये समाज कैवार घेऊन भलतीच स्पर्धा रंगलेली दिसते. कधी अण्णा तर वित्तीय संस्थांमधील राजकारण आणि अर्थकारणातील गैर प्रक्रियेला आलेल्या भरतीला उधाण आणून ही मंडळी आपले इप्सीत साध्य करण्यात व्यस्त आहेत. एकमेकांच्या बौध्दीक क्षमतेचा उघडा नागडा लिलाव मांडून हे बोरू बहाद्दर स्वतःची बौध्दीक दिवाळखोरी चव्हाट्यावर मांडीत आहे हे धुंदीतील विद्वानांच्या लक्षातच येत नाही.
खरे तर या मंडळींच्या चेहर्यावर असलेला पडदा फाडल्यानंतर समोर येणारा चेहरा भेसूर असल्याची जाणीव होते. दिसते तसे नसते, दोन ओळीच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेत दडलेल्या अदृश्य शब्दांचा मतीतार्थ हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा खरा भाग असतो.
आपले विचार, आपण केलेली मांडणी, प्रतिस्पर्ध्याला चीत करण्यासाठी केलेली शब्दफेक हे सारे मटेरिअल अगदी कसं पहिल्या धारेचे आहे या गोड समजातून पहिल्या धारेच्या घोटाने यावी अशा नशेत धुंद झाले आहेत. म्हटलं तर या दोन्ही स्वभावकुळातील ही मंडळी एकाच जातकुळातील, पत्रकार हा त्यांचा धर्मही एकच. उद्देशही सारखाच. समाजप्रबोधन, चिंध्या चोरांचा पर्दाफाश करणे. तरीही एकमेकांना पाण्यात पाहण्याचा, स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करण्याची खुमखुमी दोन्ही बाजूला सारखीच वळवळताना दिसते. बरं खुमखुमीच दाखवायची ना तर स्वबळावर दाखवावी ना! पण इथे मळा माळ्याचा अन् डल्ला मारतो कोल्हा.
माध्यमक्षेत्रात अशी कोल्हेकुही करणारे बरेच बाळबोध लंकेश्वर लोकमताच्या जंगलात सकाळ संध्याकाळ डे टूडे जनहिताच्या पिकाची नासाडी करतांना दिसत आहेत. समाजातील जाणकार थोर अण्णा नाना दादांनी पुढे येऊन या कुही कुही कोल्ह्यांच्या पेकाटात लाथ हाणावी. अन्यथा अण्णा नाना दादांची हयात कश करण्याचे त्यांचे उद्योग अव्याहतपणे सुरू राहतील आणि जनमतच थोरांचा चेहरा उघडा पाडेल. तुर्तास इतकेच.
पुन्हा नक्की भेटू!
