Breaking News

श्री क्षेत्र पिंपळेश्वर मंदिर परिसरात राजकिय पुढाऱ्याच्या भुमीपुजन उद्घाटन करण्यास बंदी


पारनेर / प्रतिनिधी /- तालुक्यातील विरोली येथील श्री क्षेत्र पिंपळेश्वर मंदिर क वर्ग तिर्थक्षेत्र परिसरात कोणत्याही राजकिय पक्षाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत अथवा हस्ते कोणत्याच कार्यक्रमाचे भुमीपुजन अथवा उद्घाटन करू नये. मात्र गावामध्ये राजकिय पुढारी कार्यक्रम करू शकतात. असा राज्यातील आगळा वेगळा ठराव विरोली ता .पारनेर येथील ग्रामसभेने घेतला आहे .प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वाच्या ग्रामसभेत हा महत्त्वपुर्ण ठराव प्रथम क्रमांकाने ग्रामपंचायत माजी सदस्य विश्वास रोहकले यांनी मांडताच ग्रामस्थानी टाळ्याच्या गजरात या ठरावाचे स्वागत केले.
या ठरावा बाबत स्पष्टीकरण देताना विश्वास रोहकले म्हणाले की, श्री क्षेत्र पिंपळेश्वर देवस्थान हे ग्रामवासीयासह परिसरातील भाविकांचे अखंड श्रद्धास्थान आहे . मंदिर परिसरात लोकसहभागातुन कोटयावधी रुपयांची कामे झाली. मात्र ही कामे होताना सर्वच राजकिय पुढाऱ्यानी छोटे गाव म्हणुन या विकास कामाकडे सोयीस्करपणे पाठ फिरवली. विरोली हे शासनाचे प्रथम तंटामुक्त गाव म्हणुन प्रसिद्ध आहे . गावामध्ये विविध राजकिय पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते गावात असतानाही कधीच वादविवाद होत नाही . मात्र राजकिय पुढाऱ्याच्या आखाड्यापासुन मंदिर दुर राहीले पाहीजे . त्यामुळे गावामधील शांतता भंग न होता सर्व ग्रामस्थ राजकिय गट- तट विसरून ग्रामदैवताच्या विकास कामाला पुढाकार घेतील .

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रभाती मोरे होत्या . यावेळी ग्रा पं . सदस्या वैशाली रोकडे , बबन डोळस , जयसिंग मोरे , पंढरीनाथ भागवत , पत्रकार संजय मोरे यांनी विविध विकास कामांचे ठराव मांडले. ग्रामस्थानी टाळ्यांच्या गजरात सर्व ठराव एकमताने मंजुर केले.सरपंच प्रभाती शंकर मोरे यांनी ग्रामसभेत झालेल्या ठरावावर जबाबदारीने कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने ग्रामसभेचा समारोप करण्यात आला .

यावेळी उपसरपंच जिजाबाई गाडगे , ग्रां. प . सदस्य रमेश गाडगे , सुनिता गाडगे , राजश्री बुचडे , वैशाली रोकडे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सावकार बुचुडे , माजी सरपंच दत्तू पाटील भागवत , कान्हुर पठार पतसंस्थेचे संचालक गावराम गाडगे , भाऊसाहेब गाडगे, मनोहर मोरे , ग्रां .प . माजी सदस्या मिनाक्षी बुचूडे , बाबा किसन भागवत , माजी उपसरपंच रभाजी मते , यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते . ग्रामसेविका सविता बोर्डे यांनी मागील सभेचे अहवाल वाचन करून प्रास्ताविक केले .