Breaking News

ज्योती शर्मा व अनुराधा फुंदेच्या उपक्रमामुळे वंचितांना मिळाली मायेची ऊब !!


पाथर्डी/शहर प्रतिनिधी/- माणूसकी म्हणजे नेमकं काय..? आणि ती जपायची, जोपासयची नेमकी कशासाठी..? कशासाठी करायची ही धडपड..? काय देणंघेणं आहे, या साऱ्या खटाटोपांमागे..? नाही केला हा खटाटोप, तर काय बिघडणार आहे. आपल्या प्रपंचाचं..? करत आहोतच तर काय मिळणार आहे, आपणाला यातून..? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं गेल्या महिनाभरात, ज्योती शर्मा आणि अनुराधा फुंदे यांनी दिली आहेत; 'जगूया थोडं माणूसकीसाठी' या उपक्रमातून! प्रत्यक्षात मात्र या दोघींही धडपडत आहेत माणूसकी आणि फक्त माणूसकीसाठीच!
आपल्या जवळचं जुनं नवं, जे काही आपणांसाठी निरुपयोगी आहे, ते आम्हाला द्या! आम्ही ते देवू; ज्यांना त्याची गरज आहे त्यांना! फक्त जे आपणाला नको आहे. ते आमच्याकडे आणून द्या! मग ते जुने कपडे असोत, जुन्या वस्तु असोत वा जुनं जे काही आहे, जे आपणांसाठी निरुपयोगी आहे. परंतु ज्यांच्यासाठी ते फार काही मोलाचं ठरणार आहे, त्यांच्यासाठी द्या! असं आवाहन या दोघींनी केलं.

संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत या दोघींनी, तहसिलदार नामदेव पाटील यांच्या शुभहस्ते, 'जगू या थोडं माणूसकीसाठी' या कार्यक्रमाची मुहुर्तमेढ रोवली. आणि पाहता पाहता त्यांच्या या कार्याला मोठं स्वरुप प्राप्त झालं. तेव्हापासून झपाटल्यागत काम करताना या दोघींनी, गेवराई येथील, 'बालग्राम' या अनाथ आश्रमाला सस्नेह भेट देऊन तेथील मुलांना, पाथर्डी शहरातील मुलांच्या व एका दानशूर व्यापाऱ्याच्या माध्यमातून, कपडे, स्वेटर्स व धान्य दिले. डोईफोडे वस्तीवरील चौदा विधवा माता-भगिनींना साडीचोळी देवून त्यांचा सन्मान केला. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील, तोरणमाळ येथील आदिवासी पाड्यातील मुलांना कपडे पोहोच केले. नारायणगडावर निःस्वार्थीपणे भक्ती करणाऱ्या निवासी भक्तांना, स्वेटर्स, ब्लँकेट्स व जर्किन्स दिली.

पाथर्डी बसस्थानकावरील फिरस्ती कुटुंबं असोत वा भटक्या जमातींच्या पालातील कुटुंबं असोत, गरीब मुलांना सायकल वाटप करण्याबरोबरच अजून कुणी मदतीविना वंचित राहिलंय काय..? या शोधात त्या दोघी निरंतर फिरतात. त्यांच्या या कामात त्यांना, सुरज शर्मा, नितीन फुंदे, कल्पजीत डोईफोडे, चेमटे मेजर, शीतल फासे, अय्युबभाई व चंद्रपूर जिल्ह्यातील कार्तिक बल्लावार हा धेय्यवेडा तरुण मोलाची मदत करतात. सामाजिक माध्यमांवर चमकोगिरी करणारे, अथवा वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद-दुसरा फळवाटपासारखा कार्यक्रम करुन सामाजिक बांधीलकीचा आव आणणारे कित्येक बेगडी समाजसेवक ठायी ठायी आढळतात. परंतु निष्काम भावनेतून सातत्त्याने काम करणाऱ्या ज्योती शर्मा व अनुराधा फुंदे आणि त्यांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांसारखी माणसं फार विरळ झाली आहेत. जे का रंजले गांजले, त्यांशी म्हणे जो आपुलेI तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा II याची प्रचिती देणाऱ्या त्यांच्या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा!