Breaking News

बापू बिरु वाटेगावकर यांचे निधन!


सांगली : सांगली-सातार्‍यासह पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’प्रमाणे आयुष्य जगलेले बापू बिरु वाटेगावकर यांचे निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. इस्लामपुरातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. बापू बिरु वाटेगावकर अर्थात आप्पा यांचे वाळवा तालुक्यातील बोरगाव हे गाव. बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून ते परिचीत होते.
गेल्या काही वर्षांपासून त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता. जुलै 2017 मध्ये त्यांच्यावर मावळातील सोमटणे फाटा इथल्या पवना हॉस्पिटलमधे सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. इतकं वय झाले असताना सहसा शस्त्रक्रिया केली जात नाही. मात्र भारदस्त बांधा, बलदंड शरीर आणि दांडगी ताकद असल्याने, आप्पांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. काही दशकापूर्वी गावगुंडांची मुजोरी मोडून काढून, बापू बिरु वाटेगावकर यांनी सांगली परिसरात रक्तरंजीत इतिहास रचला. गोरगरिबांवर अन्याय करणार्‍यांची खांडोळी करुन, गरिबांना मदत करण्यासाठी बापूंनी कायदा हातात घेतला. अनेकांची त्यांनी हत्या केली. बापू बिरु वाटेगावकर यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांना समाजप्रबोधनाचे काम केले.