दावल मलिक देवस्थान ट्रस्ट्रच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री
कर्जत शहराच्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दावल मलिक देवस्थान ट्रस्टच्या नावावरील जमीन ही पूर्वी देवस्थानच्या दिवाबत्ती व पुजाऱ्याच्या उपजीवीकेसाठी इनाम मिळाली होती. सदरची वर्ग ३ ची जमीन विकता येत नसताना वा या जमिनीवर कुळ लागत नसताना सदर देवस्थानचे ट्रस्टीनी धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाने महसुल प्रशासनाचे हात ओले करत जमीन विक्रीचा सपाटा लावला. देवस्थानची जमीन बेकायदेशीररित्या वर्ग 3 मधुन वर्ग १ करुन अनाधिकृत विक्री केली गेली आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी थेट मागणी कर्जत तालुक्यातील चांदे येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास सूर्यवंशी यांनी केली आहे. कर्जतच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे दि. 14/06/2017 रोजी पुराव्यासह याबाबत तक्रार केली. यावरून उपविभागीय अधिकारी नष्टे यांनी दि. 06/10/2017 रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना चौकशी अहवाल पाठविला आहे. तेथून जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ पातळीवर हा अहवाल पाठविला असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. याबाबत आपण थेट महसूलचे आयुक्त डॉ महेश झगडे यांचेकडे तक्रार करून या सर्व प्रकरणाकडे लक्ष वेधले. सदर प्रकरणात अधिकारी यानी अहवाल मुद्दामपणे अर्धवट पाठविला असून,यामध्ये जबाबदार तलाठी वा मंडळअधिकारी याचेवर कोणतेही भाष्य केलेले नाही.वा ठपका ठेवलेला नाही त्यामुळे साहजिकच अधिकारी आपल्या कर्मचार्याना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सदर जमिनीच्या व्यवहारात कर्जत येथे कार्यरत असलेले त्यावेळचे तहसीलदार थोरात यांनी काढलेल्या आदेशाची महत्वाची संचिकाच कर्जत तहसील कार्यालयात उपलब्ध नसल्याने या सर्व प्रकरणातील गौडबंगाल वाढले आहे.
कर्जत शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या या कोट्यावधीच्या जमिनीच्या सत्यतेबाबत होत असलेल्या व्यवहाराबाबत आत्तापर्यत कोणीही तक्रार करण्यास धजावत नव्हते. मात्र संशयास्पद कागदपत्राबाबत सातत्याने दबक्या आवाजात चर्चा होत होती. तरीही अनेकांनी येथे स्वस्तात मिळणारे जमिनीचे तुकडे मिळवून फायदा करून घेतला आहे. मात्र या सर्व व्यवहाराबाबत शासकीय दरबारी तक्रार दाखल झाली असल्याने यावर शासकीय पातळीवर कोणता निर्णय होतो. याकडे अनेकांचे लक्ष लागणार असून सदर प्रकरण कर्जत तालुक्यात खळबळ माजविणार असल्याचे बोलले जात आहे. कर्जत तालुक्यात अशाच पद्धतीने अनेक इनामाच्या जमिनी परस्पर लाटण्याचे उद्योग सुरु असून, त्याकडे प्रशासकीय अधिकारी स्वत:चा फायदा करून घेत दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप सूर्यवंशी यांनी करताना, सदर जमीनीचे होणारे बेकायदेशीर हस्तांतरणामुळे त्या देवस्थानचे भरुन न येणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे या व्यवहारात जे अधिकारी, कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन अनधिकृत झालेले वर्ग 1 चे क्षेत्र पुन्हा वर्ग 3 करुन देवस्थानचे नाव पूर्ववत लावावे अशी ही मागणी सूर्यवंशी यांनी आपल्या तक्रारी अर्जात केली आहे.
