Breaking News

दखल - आता तरी दलित जागे होतील?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत येऊन साडेतीन वर्षे होऊन गेली आहेत. या काळात सातत्यानं दलित, मुस्लिमांवर अन्याय होत आला आहे. मंत्री वादग्रस्त विधानं करीत आहेत. काँगे्रसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केल्याचं सांगत दलितांना आपलसं करण्याची भाषा एकीकडं करायची आणि दुसरीकडं दलितांना अपमानास्पद वागणूक द्यायची, असं सुरू आहे. गुजरातमधील उनाचं प्रकरण घ्या, नाहीतर उत्तर प्रदेशातील सहारनपूरचं; सर्वांमागची मानसिकता एकच. कोरेगाव भीमाच्या दंगलीमागं कोण आहे, हे सरकारला अजून सिद्ध करता आलेलं नाही. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांनातीन आठवडे झाले, तरी साधी अटक होत नाही. दलितांवर जिथं जिथं अन्याय होईल, तिथं तिथं धावून जाणारा नेता म्हणून रामदास आठवले यांची ओळख; परंतु सत्तेच्या पाण्यानं वाघाची शेळी झाली आहे.


औरंगाबादच्या सभेत त्यांना बोलू दिलं नाही. जनमत कुठं चाललं आहे, हे त्यांच्या अजून लक्षात यायला तयार नाही. आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या दलितांबाबतच्या भावना काय आहेत, हे त्यांना अजून कळायला मार्ग नाही. राज्यघटना बदलायची भाषा त्यांच्या मस्तकात जात नाही. वादळं उठल्यानंतर माघार घेतली, तरी पोटात काय आहे, ते कधीतरी ओठावर येतेच. अनंतकुमार हेगडे नावाचे वादग्रस्त मंत्री सरकारची डोकेदुःखी वाढवीत आहे. कर्नाटकमध्ये भाजपला यश मिळावं, म्हणून त्यांना मंत्रिपदाची झूल पांघरली, तर आता तेच इतकी वादग्रस्त विधानं करीत आहेत, की त्यांच्यामुळं सत्ता गेली, असं भाजपचं व्हायला नको. 
केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्री अनंतकुमार हेगडे पुन्हा नव्या वादामुळं चर्चेत आले आहेत. बल्लारी येथे कार्यक्रमासाठी जाताना त्यांच्या गाडीसमोर दलित आंदोलकांनी निदर्शनं करून त्यांच्या याआधीच्या वक्तव्यांचा निषेध केला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ‘आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार भारताचं रुपांतर ‘स्कील्ड भारता’मध्ये करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ‘भुंकणार्‍या भटक्या कुत्र्यां’कडं लक्ष न देता आम्ही आमच्या बांधिलकीसह या मार्गावर चालत राहू,’ असं विधानही त्यांनी भाषणात केलं. भटकी कुत्री हा शब्दप्रयोग केल्यानंतरदलितांमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली आणि कार्यक्रमानंतर त्यांनी हेगडे यांचा पुन्हा निषेध नोंदवला आहे. हेगडे यांच्या या विधानाचा निषेध करताना अभिनेते प्रकाश राज यांनी टि्वट करत त्यांना खडे बोल सुनावले. हेगडे यांनी दलितांबाबत अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला असल्याचं प्रकाश राज यांनी टि्वटरवर म्हटलं आहे. अनंतकुमारांचं आता अति झालं आहे. ते हे वारंवार दलित समाजाबाबत अपशब्द वापरत आहेत. आता तर त्यांनी दलितांना कुत्रे म्हणण्यापयर्ंत मजल मारली आहे. हे आता अति झालं आहे. त्यामुळं त्यांच्यावर भाजपच्या वरिल नेत्यांनी कारवाई करून त्यांना पदावरून हाकलावं, अन्यथा हेगडे यांच्या वक्तव्यांना तुमचा संपूर्ण पाठिंबाच आहे, असं मानलं जाईल, असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. 
अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी वादग्रस्त विधान करून रोष ओढव्ाून घेतला होता. ‘स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणर्‍यांना त्यांच्या आई-बापांचा पत्ता नसतो. आम्ही राज्यघटना बदलण्यासाठीच सत्तेत आलोय,’ असं वक्तव्य हेगडे यांनी याआधी केलं होतं. त्यांनतर संसदेत त्यावर खडाजंगी झाली. आपल्या विधानाचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील, असं लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचं जाहीर वक्तव्य करणारे अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीशी संबंधित विविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत आंबेडकरी अनुयायांनी हा तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला. कर्नाटक विधानसभेची निवडणूक याच वर्षी आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी भाजपला दक्षिण दिग्विजयाचं स्वप्न दाखविलं आहे. धर्मनिरपेक्ष जनता दल, काँग्रेसमध्ये फूट पाडून त्यांच्या आमदारांना भाजपत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा वेळी दलित आणि मुस्लिमांना दुःखवून मतांचं धु्रवीकरण करण्याचा प्रयत्न हेगडे यांनी चालविला असला, तरी त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यप्रदेश राज्यातील नगरपालिकांचे निकाल लक्षात घेऊन भाजपनं आपल्या नेत्यांच्या जिभा नको तशा वळवळणार नाहीत, याचं भान ठेवलं पाहिजे. मिलिंद एकबोटे यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणार्‍या, त्यांच्या अटकेला विरोध करणार्‍या पुण्यातील दलित समाजातील कथित नेत्यांना भाजपच्या नेत्यांच्या मनात आणि पोटात काय आहे, हे समजलं तरी खूप झालं. ठरावीक समाजाच्या नेत्यांना देशद्रोही म्हणायचं, त्यांच्यावरच्या आरोपाची सिद्धता होण्याअगोदर त्यांच्याबाबत मनं कलुषित करायची, हे तंत्र आता फार काळ चालणार नाही. पुरावे असतील, तर ते न्यायालयात सादर करून सिद्ध करण्याची सरकार पक्ष म्हणून जबाबदारी भाजपचीच असताना ते करायचं सोडून उपेक्षित, तळागाळातील समाजातील नेत्यांना मोठंच होऊ द्यायचं नाही, त्यासाठी हार्दिक पटेल यांच्याबाबत जसे काहीही मार्ग वापरले, तसे वापरायचे, हे आता बंद करायला हवं. प्रवीण तोगडिया, संजय जोशी यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या जे वाट्याला आलं, ते इतरांच्या येऊ नये,यासाठी दक्ष राहायला हवं.