Breaking News

एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल कबीर कला मंचाच्या सहा कार्यकर्त्यांचा समावेश

पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पुण्यात झालेली एल्गार परिषद आता चांगलीच अडचणीत आली. कारण गुजरामधील दलित समाजाचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा उमर खालिद यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

कोरेगाव-भीमाच्या लढ्याला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर 31 डिंसेबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पण या कार्यक्रमानंतर 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा जवळच्या सणसवाडी परिसरात हिंसाचार उफाळून आला होता. यात एका तरुणाचाही मृत्यू झाला होता. तर स्थानिकांचं मोठं नुकसान झाले होते. 

या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या हिंसाचाराप्रकरणी आता एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कबीर कला मंचचा समावेश करण्यात आला आहे. 

पोलिसांनी कबीर कला मंचाच्या सहा जणांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुधीर ढवळे, सूत्र संचालन करणारे सागर गोरखे व त्याचे अन्य कलाकार, हर्षाली पोतदार, रमेश गायचोर, दीपक डेंगळे, ज्योती जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडे तुषार रमेश दामगुडे यांनी फिर्याद दिली आहे.