Breaking News

राज्यात थंडीचा कहर ; मुंबई गारठली


मुंबई : राज्यासह देशभरात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये बोचर्‍या थंडीमुळे लोक गारठून गेले आहेत. सातार्‍याच्या वेण्णालेक परिसरात 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मुंबईत काल नीचांकी म्हणजे 13.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे कधी नव्हे ते मुंबईकरही स्वेटर घालून दिसत आहेत. मुंबईकरांची आजची सकाळही थंडीनेच सुरु झाली आहे. वातावरणात गेल्या दोन दिवसांपासून असलेला गारवा आजही टिकून आहे. तर नाशिक जिल्ह्यातील निफाडचे तापमान तर 7.4 अंश सेल्सिअसवर आले आहे. निफाड परिसरात द्राक्षाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मात्र थंडीमुळे द्राक्षमण्यांची फुगवणी थांबली. त्यांना तडे गेले आहेत, यामुळे द्राक्ष निर्यात होईल की नाही याची भीती बागायतदारांमध्ये आहे. उत्तर भारतात थंडीचा कहर सुरु आहे. उत्तर पूर्व भागातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळते आहे. थंडीमुळे रेल्वेची वाहतूक 17 ते 20 तास उशिराने सुरु आहे. राजधानी दिल्लीची सध्याची पहाट दाट धुके आणि थंड वार्‍याने होत आहे. दुसरीकडे राजस्थानच्या फतेहपूरमध्ये उणे 1 पूर्णांक 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतातील स्वर्ग अशी ओळख असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक थंडीने चांगलेच गारठले आहे. श्रीनगरमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी उणे 6 पूर्णांक 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.