Breaking News

मुंबईत होणारी ‘ग्लोबल समिट’ ही विदर्भात गुंतवणुकीसाठी चांगली संधी - मुख्यमंत्री


मुंबई येथे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन 2018’ग्लोबल समिट प्रथमच होत आहे. या समिटचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार आहे. सध्या राज्यात औद्योगिक वातावरण चांगले आहे. तेव्हा ग्लोबल समिट नागपूर - विदर्भात गुंतवणूक वाढविण्यासाठी चांगली संधी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (बीएमए)च्या सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, बीएमए अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव जीवन घिमे, कोषाध्यक्ष प्रशांत मेश्राम यावेळी उपस्थिती होते. बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या श्री. एम के गोयल सभागृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. हे सभागृह गोयल परिवाराने बांधून दिले आहे. या कार्यक्रमात असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर मेट्रो बुटीबोरी एमआयडीसीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. बुटीबोरी उड्डाणपूल श्री. गडकरी यांच्या सहकार्याने करणार आहे, त्याबाबत निर्णय झाला आहे. बुटीबोरी येथील एमआयडीसी परिसरात कन्व्हेंशन सेंटर तयार करावे अशी मागणी असोसिएशनने आपल्या निवेदनात केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर येथे जागतिक दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर तयार करण्याचा मानस आहे. त्यासाठी250 एकर जागा लागणार असून योग्य जागेचा शोध सुरू आहे. जागा प्राप्त होताच कन्व्हेंशन सेंटर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल.