Breaking News

दखल - सत्तेवर बहूजनांचाच हक्क ! पण...?

महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या एकूण लोकसंख्येच्या आकडेवारीचे प्रमाण पाहिल्यानंतर देशाच्या प्रत्येक सत्तास्थानावर दीन दुबळा उपेक्षित म्हणविला जाणारा बहुजनाचा अधिकार दिसतो, नव्हे या समाज घटकाने मनात आणले तर बहुजनांचा देश आणि बहुजनांचीच सत्ता हे समीकरण प्रत्यक्ष अमलात आलेले दिसेल. पण मनात आणले तर हा शब्द या ठिक ाणी अटी शर्तींच्या रांगेत ध्रूव तार्‍यासारखा रूसून बसला असल्यामुळे बहुसंख्य असलेला बहुजन सत्तेच्या दारातही दिसत नाही,जे दिसतात ते फक्त नावापुरते उरले असून प्रस्था पितांच्या दावणीचे बैल म्हणून मिरवण्यात त्यांना स्वारस्य उरले आहे, खितपत पडलेल्या बहुजनांशी त्यांची नाळ केंव्हाच तुटली आहे.

ग्रामीण भारत आणि बहुजन यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच खरा भारत पहायचा असेल तर खेड्याकडे चला आणि भारताला महासत्ता बनवायची असेल तर खेड्यांना स्वावलंबी बनवा अशी हाक राष्ट्रपिता महात्मा गांधी दिली होती. राष्ट्रपित्याबद्दल राजकीय मतभेद असू शकतील पण गावखेड्याच्या, पददलित, दीनदुबळ्यांच्या उपेक्षित कोमेजलेल्या जीवनात विकासाची संजीवनी फुलवण्यासाठी महात्मा गांधींनी दिलेले विचार कुठल्याही विचारसरणीला स्वागतार्हच असायला हवेत. भारताच्या ग्रामीण भागात राहणारी मोठी जनसंख्या जोपर्यंत विकासाच्या मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत भारताचा खरा विकास होणे अशक्य आहे. ही त्यांची धारणा आजही आहे तशीच भारताला लागू आहे.


महात्मा गांधी समकालीन सर्वच देश हितकारी नेत्यांची हीच भावना होती, मात्र सत्तेचा बाजार जसजसा विकसीत होत गेला तसतसी ही भावना मागे पडत गेली आणि विकासावर नव्हे तर जातीपातीच्या राजकारणावर सत्तेचे राजकारण सुरू झाले. हा खेळ इतका पराकोटीला नेऊन ठेवला गेला की, दोन समाजात भांडणे लावल्याशिवाय सत्तेचे वर्तूळ पुर्ण होत नाही. कालांतराने दोन समाजाव्यतिरिक्त एकाच समाजात गटतट पाडून एकसंघ समाजाची छकले पाडली गेली, त्यानंतर एकाच कुटूंबात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची विचारसरणी पेरून कुटूंबातही भांडणे लावली गेली.

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर मराठा आणि दलित या दोन संख्येने तुल्यबळ असणार्‍या दोन समाजात विद्वेषाचे बीज पेरून सत्तेचे भुक भागत नाही म्हणून मराठा-मराठा, दलित-दलित अशी समाजातच विभागणी करून त्या त्या समाजाची छकले पाडून सत्तेचे राजकारण यशस्वी केले जात आहे. मराठा आणि दलित जे दोघेही बहूजन समाजातील प्रमुख बहुसंख्य आणि म्हणूनच निर्णायक समाज आहेत त्यांच्यात ऐक्याची भावना कधीच रूजणार नाहीत याविषयी एका विशिष्ट विचारसरणीने सतत कुटील प्रयत्न के ले. आणि याच विचारसरणीचा सत्तास्थानांवर प्रामुख्याने अंकूश राहिल्याचे दिसते. अर्थात या परिस्थितीला बहुसमाजाने ताकद दिलेले त्या त्या समाजाचे राजकीय नेते कारणीभूत आहे ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.समाजाचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावर आलेला नेता मोठा होता,समाजाच्या पाठबळावर सत्ताधार्‍यांना घाम आणण्याइतपत उपद्रव मुल्य निर्माण क रतो. आणि कालांतराने याच उपद्रव मुल्यांचा सत्तेच्या बाजारात लिलाव मांडून तत्कालीन सत्ताधार्‍यांच्या गव्हाणीत बांधलेला बैल म्हणून मुंडी हलवत रवंथ करण्यातच जीवनाचे हशील मानतो. बहुजन समाजाला हा शाप आहे. समाजातील या आपल्या म्हणविणार्‍या नेत्यांची इच्छाशक्ती फुसकी निघाल्याने कुवत असूनही हा समाज या देशाचे नेतृत्व करण्यास नालायक ठरला आहे. मराठा समाजाने तर शपथचा घेतली आहे. प्राण गेले तरी बेहत्तर, शेठजी भटजीकडे चाकरी करील पण ताठ कण्याचा स्वाभीमान वापरून स्वबळावर साम्राज्य निर्माण करणार नाही. आंबेडकरी जनतेची अवस्था तीच आहे. या दोन्ही समाजात जेव्हढी कुळं आहेत तेव्हढे नेते तयार झाले आहेत. कुणीच कुणायला जुमानत नाही. त्याचा फायदा आपसून संख्येने कमी पण बुध्दीने चलाख कपटी असलेल्या विशिष्ट विचारसरणीने घेतला आहे, घेत आहे. मराठा आणि आंबेडकरी जनतेचे नेते म्हणून समाज मान्यता मिळालेल्या नेत्याला तुकडा फेकला की शेपूट घातलेला लोंडा घोळत जिभल्या चाटत सत्तेच्या गव्हाणीत रवंथ करायला तयार असतो. ही मानसिकता त्यांनी ओळखली आणि बहुजनांच्या देशात कायम त्यांनीच सत्ता राबवली. आज आणि उद्याही या परिस्थितीत फारासा फरक पडेल अशी परिथिती नाही. या समाजनेत्यांना बहूजन समाज स्वतःहून हद्दपार करणार नाही, त्यांच्या पेकाटात लाथ घालणार नाही तोपर्यंत बहुजनांच्या स्वतंत्र देशात गुलाम म्हणून राहण्याची पाळी बहुजनावर आचंद्र सुर्य राहील हे भविष्य वर्तविण्यासाठी ज्यो तिषाची गरज नाही. मराठा किंवा आंबेडकरी जनतेच्या लक्षात ही कावेबाज रणनिती लक्षात आल्यानंतर समाजाने नेतृत्वाविना अनेक सामाजिक प्रश्‍न सोडविण्याचा संकल्प सिध्दीस नेणारी चळवळ हाती घेतली आहे. या समाज रेट्याच्या वार्‍याची दिशा लक्षात घेऊन वेगवेगया गटतटात विखूरलेले समाजनेते ऐक्याची भाषा बोलत असाले तरी मनात असलेली सत्तेची उब घेण्याची मनिषा त्यांच्या ओठावरून लाळेसारखी ओघळताना दिसते. हेच समाजाचे खरे दुर्दैव आहे.