Breaking News

सत्तेतून बाहेर पडा, मग टीका करा : एकनाथ खडसे. खडसे यांनी घेतली गडकरी यांची भेट

जळगाव : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून एकनाथ खडसे यांच्यावर शेलक्या शब्दातून केलेल्या टीकेवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना सत्तेत बसून भाजप आणि सरकारवर टीका करते. त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतर टीका करावी. पण त्यांच्यात सत्ता सोडण्याची हिंमत नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.


भाजपचे राज्यातले नाराज नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी सकाळी नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. एवढेच नाहीतर या दोन नेत्यांनी सकाळचा ब्रेकफास्टही सोबतच घेतला. यावेळी खडसेंच्या सून खासदार रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती अजून गुलदस्त्यातच असली तरी या भेटीमुळे भाजपमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळात परत घेण्याचे कुठलेच संकेत मिळत नसल्याने एकनाथ खडसे सध्या भाजपवर प्रचंड नाराज आहेत. 

याच नैराश्येपोटी हल्ली खडसे उघडपणे पक्षनेतृत्वावर टीका करू लागलेत. मला पक्षातून बाहेर ढकलले जात असल्याची उद्विग्नताही त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यामुळे या पार्श्‍वभूमीवर गडकरींसोबतच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. खडसेंचा राजकीय वनवास संपवण्यासाठी गडकरी पक्षश्रेष्ठींकडे काही शब्द टाकताहेत का ? याचीही शक्यता नाकारता येत नाही कारण राज्याच्या राजकारणात खडसे हे पहिल्यापासून गडकरी गटाचे समर्थक मानले जातात.

‘सत्तेचा गैरवापर करून खडसे यांनी शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कर्माची फळे त्यांना मिळत आहेत. खडसे पक्षात राहिले काय किंवा गेले काय, भाजपला आता काहीच फरक पडत नसून खडसे सध्या उपेक्षा आणि मानहानीचं जीवन जगत आहेत. सत्ताबदलानंतर ते मुख्यमंत्री व्हायला म्हणजे ‘हीरो’ बनायला निघाले होते, पण राजकीय रंगमंचावर त्यांना जो ‘साईड रोल2 मिळाला तो देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढून घेतला,’ अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली होती. याला एकनाथराव खडसे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही आणि ते माझ्यावर टीका करत आहेत. आधी सत्तेतून बाहेर पडा, हिंमत दाखवा आणि मगच माझ्यावर टीका करा,’ अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला सुनावले आहे.