संविधान रॅली काढण्यावर आ. जितेंद्र आव्हाड ठाम
संविधान बचावचा रॅलीला बीपीटीसीने परवानगी नाकारलेली नाही. तसे, पत्रही त्यांनी आम्हाला पाठवलेले नाही. त्यांनी जे पत्र पाठवले आहे. त्या पत्रामध्ये मुशाय-याचा कार्यक्रम असल्याचे नमूद केले आहे. मात्र, आमच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे, असे या पत्रात नमूद केलेले नाही. त्यामुळे रॅली होणारच आहे. शिवाय पोलिसांनीही आम्हाला परवानगी दिलेली आहेच. आमची रॅली दुपारी 1 वाजता निघणार असून दोन वाजेपर्यंत पोहचणार आहे. त्यानंतर साधारणपणे साडेतीन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असून या ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर केला जाणार नसून घोषणाबाजीही केली जाणार नाही. त्यामुळे मुशाय-याच्या कार्यक्रमाला बाधा येण्याची कोणतीही शक्यता नाही, असे नमूद करुन शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांना वंदन करण्यास कोणी आम्हाला मज्जाव केला तर तो मज्जाव आम्ही जुमानणार नाही. आता पर्यंत आमच्या मनात असे होते की, शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांना वंदन करण्यासाठी कोणाला विचारण्याची गरजच नाही. आता आम्ही विचारले आहे. पण, ते मज्जाव करीत असतील तर आमचा कार्यक्रम होणार. आम्ही संविधान रॅली अत्यंत शांतपणे , कोणत्याही प्रकारची घाषणाबाजी न करता, कसलीही पोस्टरबाजी न करता बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन शिवरायांच्या चरणी गेट वे ऑफ इंडिया येथे नतमस्तक होणार, हा आमचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. पोलिसांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे. बीपीटीने आम्हाला कळवलेले आहे की त्यांचा एक कार्यक्रम आहे. पण, त्यांच्या कार्यक्रमाला बाधा न आणता आम्ही शिवरायांना वंदन करणार, असेही संविधान बचाव रॅली संयोजन स मितीच्या वतीने आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.