Breaking News

समाजाची फसवणूक करण्याचे षडयंत्र आणखी किती दिवस राबविणार?

सत्य नेहमी कटू असते. कटू डोस पचविण्यासाठी धीर गंभीरता लागते. त्याहीपेक्षा मन निर्मळ आणि हेतू शुध्द असावे लागतात. कुणी उणिवा, त्रुटी दाखविल्या तर मंथन करून त्या दुर करण्याची मानसिकता असावी लागते. प्रदूषित, हेकेखोर, लबाड, स्वार्थी मंडळी सत्य पचवू शकत नाहीत. टिकाकारांच्या जवळही उभे राहण्याचे धाडस ते दाखवू शकत नाहीत. निंदकाचे घर असावे शेजारी हे संत शिरोमणी तुकोबा रायांनी उगीच म्हटलय का? संत वचनांशी सुतरामही संबंध नसलेल्या किंबहूना संतांच्याच नावावर सामान्यांची लुट, फसवणूक करणार्‍या भामट्यांना त्यांचे दोष दाखविणारे रूचत नाहीत. असा अनुभव गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील हजारो कुंभारांनी घेतला. आणि 5 मार्चला कुंभाराची अस्मिता आणि स्वाभिमान म्हणविणारा मोर्चा काढणारे कथित, स्वयंघोषीत पुढार्‍यांना समाजानेच उघडे पाडले.


5 मार्चला निघणार्‍या कुंभार समाजाच्या मोर्चा संदर्भात गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आम्ही हा मोर्चा, मोर्चाच्या अजेंड्यावर असलेल्या कुंभार समाजाच्या मागण्या, या मागण्यांचा समाजावर होणारा संभाव्य परिणाम आणि विशेष म्हणजे मोर्चाचे नेतृत्व करणार्‍या कथित पुढार्‍यांचे आजवरचे कारनामे, समाजाविषयी या पुढार्‍यांना असलेली खोटी कळकळ या संदर्भात वस्तूस्थिती दर्शविणारे काही मुद्दे याच स्तंभातून उपस्थित केले होते.

गेले दोन दिवस प्रसिध्द झालेला हा मजकूर समाजात व्हायरल झाल्यानंतर या कथित पुढार्‍यांच्या वेगवेगळ्या कारनाम्याबाबत आजवर अनभिज्ञ असलेला कुंभार समाजातील सामान्य माणूस या पुढार्‍यांना जाब विचारू लागल्याने त्यांच्या पायाखालची जमीन हादरू लागली. सामाजिक भुकंपाच्या या धक्याने पुढारपणच नाही तर अवघे आयुष्य उध्वस्त होऊ शकते या भयावह जाणिवेतून या स्वघोषीत पुढार्‍यांनी प्रश्‍नांना उत्तरे देण्याचे टाळून प्रश्‍न कर्त्या समाजापासून पळ काढला. सोशल मिडीयावर ज्या ज्या सामान्य कुंभारांनी या पुढार्‍यांना प्रश्‍न विचारले त्या सर्वांना पुढारी आणि पुढार्‍यांच्या तुकड्यावर पोसलेल्या बगलबच्च्यांनी संबंधित ग्रूपमधून बाहेर काढले. यावरून या मंडळींची मानसिकता समाजाच्या लक्षात आली. हा मोर्चा अखिल कुंभार समाजाचा नाही तर चार डोके एकत्र येऊन स्वतःला पुढारी म्हणविणार्‍या लबाडांच्या टोळीने काढलेला आहे हे समाजाने ठासून सांगण्यास सुरूवात केली आहे.

या लबाड मंडळींनी समाजाला कसे फसविले. हयात नसलेल्या काही सज्जनांच्या सह्या करून शासन आणि समाज या दोघांनाही फसवून आपली दुकानदारी कशी केली याचेही पुरावे देण्यास समाज पुढे येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ या संस्थेचा चेंज रिपोर्ट धर्मादाय सह आयुक्त पुणे यांना सादर करतांना या भामट्यांनी चक्क मृत सभासदांच्या सह्या करून चेंज रिपोर्टला मंजूरी मिळवली आहे. बाबुराव साळवी चिंचवड हे दि. 20/3/1997 रोजी, जगन्नाथ मारूती कुंभार सांगली हे दि.27/1/2003 रोजी, नारायण आमगे, नागपूर हे दि.21/6 /2004 रोजी, के.आर.अकोळकर, कोल्हापूर हे दि.2/4/2008 रोजी मयत झाल्याचा मृत्यू दाखला उपलब्ध असतांना या भामट्यांनी हे सभासद हयात आहेत असे भासवून त्यांच्या बनावट सह्या केल्या आणि धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्या डोळ्यात धुळ फेकून 24/12/2010 रोजी चेंज रिपोर्ट मंजूर केला. हा गंभीर गुन्हा केलेले महासंघाचे हे बेकायदेशीर प्रवृत्तीचे पुढारी खोटा चेंज रिपोर्ट असलेल्या महासंघाच्या नावावर मोर्चाचे आयोजन करून समाजाची दिशाभुल करीत आहेत. या मंडळींची जागा मोर्चाच्या अग्रभागी नाही तर गजाआड आहे. अशा प्रतिक्रिया समाजातून उमटू लागल्या आहेत. सोशल मिडीयावर टिकाकारांना रिमुव्ह करून साफ सफाई केल्याची बहादूरी गाजविल्याचा आव आणणार्‍या मंडळींनी आधी स्वतःच्या बुडाला लागलेली घाण साफ करावी म्हणजे त्या दुर्गंधीमुळे समाजात साथीचे आजार पसरणार नाहीत. असा समाजातून दिला जाणारा सल्ला स्वागतार्ह आहे.