Breaking News

नाशिक शहर पोलीसांच्या कामगीरीचा आलेख उंचावला....पण!

नाशिक/प्रतिनिधी - शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावत आहे.या प्रवास पोलीस आयुक्त डा.रविंद्र कुमार सिंगल यांचे योगदान निश्‍चितच अधोरेखीत करावे लागेल.पोलीस या भुमिकेच्या पलिकडे जावून समाजाचा घटक या नात्याने सामाजिक बांधिलकीची जबाबदारी पाळण्यात दिलेला अग्रक्रम ही विद्यमान पोलीस आयुक्तांची खासियत कायदा सुव्यवास्थेच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरली आहे.


आपल्या कर्तव्यनिष्ठ पोलीस पथकासोबत शहरात कायदा आणि सुव्यस्था राबविण्याच्या पोलीस आयुक्तांच्या मार्गात आयुक्तालयातील काही मंडळी काटे पेरण्याचा नतद्रष्टपणा करीत असल्याने प्रामाणिक कर्तृत्व झाकोळत आहे.पोलीस आयुक्तालयाची कामगीरी चांगली आहे शंकेला वाव नसला तरी अवैध धंद्यांचे जोमाने पुर्नागमन,अवैध धंद्यांना विरोध करणारे पञकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर सुडाची कारवाई, कायदे पाळणार्यांवर होणार्या हल्यांना जाणीवपुर्वक मिळणारे प्रोत्साहन तीन कोटीच्या सुटकेसचे गुढ,अशा काही बाबी संशयाला फट देत आहेत.

नाशिक शहर पोलीसांनी गेल्या वर्षभरात उल्लेखनिय सांघिक कामगीरी बजावल्याने कायदा सुव्यवस्थेच्या पातळीवर पोलिस आयुक्त डा.रविंद्रकुमार सिंगल नाशिककरांच्या अभिनंदनास पाञ ठरले आहेत.कायदा सुव्यवस्थेची सक्त अंमलबजावणी करीत असतांना कायद्याचा धाक दाखवणे क्रमप्राप्त असले तरी नाशिककरांना विश्‍वासात घेऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती आणि कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिककरांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याच्या पोलीस आयुक्तांच्या भुमिकेमुळे पोलीसांच्या सांघिक कामगीरीत गत वर्षाच्या तुलनेत दखलपाञ वाढ झाल्याचे दिसते.

डा.रविंद्रकुमार सिंगल यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तत्कालीन उधडलेली कायदा सुव्यवस्था पुर्वपदावर आणण्यास प्राधान्य दिले.शहर पोलीस दलातील काही कर्मचार्यांचे गुन्हेगारांशी असलेले नेक्सस उध्वस्त करण्यासाठी बदलीचे हत्यार उपसून पोलीस ठाण्यांची साफसफाई केली.पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे मनोबल वाढवून गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी प्रोत्साहीत केले.परिणाम स्वरूप सन 2017 या गत वर्षात पोलीस आयुक्तालयाची गुन्हेगारी दर कमी होण्यासह गुन्ह्यांचा तपास आणि गुन्ह्यात दोषारोप सिध्द होऊन सजा होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते.नाशिक पोलीसांनी गेल्या वर्षी केलेल्या उल्लेखनिय कामगीरीत गौरव पेट्रोल पंप (सात आरोपी,सहा लाख पाचशे मुद्देमाल),सुमन पेट्रोल पंप दरोडा(सहा आरोपी, तीन लाख शहात्तर हजार रू.मुद्देमाल) सुरगाणा खुन प्रकरणाची उकल,दे.कम्प मधील खुनाचा आठ वर्षानंतर यशस्वी तपास,गुन्हेगाराला अटक,एटीएम मध्ये लोकांना मदतीच्या बहाण्याने लुटणार्या भामट्याच्या मुसक्या आवळणे,अहमदनगरच्या रज्जाक शेख टोळीला वेसन घालणे,मध्यप्रदेश,हैद्राबादच्या चेनस्नचर टोळीला जेरबंद करणे,व्हाटस अप व बनावट फेसबुकचा वापर करून लोकांची बदनामी करणार्या सोशल मिडीया ठगास पकडणे,या शिवाय विविध सामाजिक राजकीय आंदोलनांची धग शहर वासियांना लागू न देणे या संदर्भात पोलीस आयुक्त डा.रविंद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीसांनी घेतलेले परिश्रम नक्कीच स्वागतार्ह आहेत.

आयुक्तालयात गेल्या वर्षीच्या कामगारीचा आढावा सादर करतांना शहरातील अवैध धंद्यांवर पोलीसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईचा माञ पोलीसांना विसर पडला.पोलीस आयुक्तालयाने वर्षभराच्या कालावधीत शहरातील अवैध धंदे उध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम आखली होती.यात पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक बहुचर्चीत जुगार अड्डा आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापार केंद्रावर झालेल्या कारवाईचा विशेष गवगवा झाला होता.थोड्याच दिवसात या दोन्ही ठिकाणी पुर्व धंदे पुर्वीच्याच जोमाने सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू आहे,या संदर्भात पञकार परिषदेत प्रश्‍न उपस्थित केला असता पोलीस आयुक्तांनी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना अशा अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले.तथापी काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या प्रश्‍नाला व्यक्तीगत स्वरूप देऊन पंचवटी पोलीस ठाण्याच्याच हद्दीत सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करून, इतकेच नाही तर भारत सरकारच्या वस्तु व सेवा कर म्हणजे जीएसटी प्रमाणपञ धारण केलेल्या सोशल कार्ड रुमवर कारवाई करण्याची मनिषा बोलून दाखवली.या कार्डरूमच्या संचालकांनी कार्डरूम सुरू करण्यापुर्वी पोलीस यंञणेला विहीत नमुन्यात अवगतही केले आहे.कार्डरूम सुरू होऊन जवळपास दोन महिने झाल्यानंतर,पञकार परिषदेत शहरातील अवैध धंद्यांवर बोट ठेवले गेल्यानंतर नियम पाळणार्या कार्डरुमवर कारवाई करण्याचा इशारा अवैध धंद्यांना पाठीशी घालण्यासाठी तर दिला नाही ना अशी शंका उपस्थित होते.दरम्यान या पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कलेक्टरच्या बदलीचा विषयही शहरात चर्चेला निमित्त ठरल्याने पोलीस आयुक्तांच्या भुमिकेशी आयुक्तालयातील इतर पोलीस अधिकार्यांच्या हेतुविषयी शंंका उपस्थित केली जात आहे.
एका बाजुला पोलीस आयुक्त स्वःता पोलीस आयुक्त डा.रविंद्रकुमार सिंगल पोलीस दलाची सर्वदूर खालावत असलेली प्रतिमा उंचावण्यासाठी जनतेला सामोरे जात आहेत.मैं हुँ डान,हेल्मेट जनजागृती,वाहतुक मिञ,चौक दत्तक योजना,छोटा पोलीस या सारखे उपक्रम राबवून हार्नमुळे होणार्या ध्वनीप्रदुषणाचे दुष्परिणाम जनतेला समजावून पोलीसांविषयी नाशिककरांच्या मनात असलेला पुर्वग्रह बाजूला सारण्यात डा.सिंगल यशस्वी होत असतांना ,पोलीस नागरिकांचे मिञ आहेत हेही सिध्द करीत असताना पोलीस आयुक्तालयातील काही मंडळी माञ सुडाचे कर्तव्य बजावतांना दिसत असल्याने गेल्या दिड वर्षाच्या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलीस आयुक्त डा.सिंगल यांची सकारात्मक भावना आणि मेहनतीचे फळ म्हणून गेल्या वर्षात खुनाच्या गुन्ह्यांचा उकल दर 95%,खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा,दरोड्याची तयारी 100% चेनस्नचींग 57%, जबरी चोरी 72%, दंगल 97%,अपहरण 84%,सरकारी नोकरांवर हल्ले98% अशी वृध्दी झाल्याचे दिसते.याचे श्रेय सर्वार्थाने पोलीस आयुक्तांना आहे.याखेरीज पर्यावरण पुरक गणपतीसेल्फी विथ गणपती,सार्वजनिक उत्सवांत जनतेचा सहभाग,डिजे पासून नाशिककरांना मुक्ती यासारखे समाजाभिमुख उपक्रम राबवून पोलीस आयुक्तांनी जनता-पोलीसांमधील दरी कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न अधोरेखीत करावा लागेल.आगामी काळात पोलीस,संरक्षण अधिकारी,समूपदेशक,विधी अधिकारी,मानसोपचार तज्ञ व वैद्यकीय सेवा या संदर्भात प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक सेवा देणारा भरोसा सेल,फिंगर प्रींट व तत्सम माहिती घेण्यासाठी अंबीस (अटोमटीक मल्टीमोडल बायोमेट्रीक आयडेंटीफिकेशन सिस्टम),पोलीस ठाण्यासह आयुक्तालयातील अन्य वरीष्ठांच्या कार्यालयात येणार्या अभ्यागतांसाठी व्हिजीटर मनेजमेंट सिस्टम ,भारतातील सर्व अटक आरोपींची माहिती देणारे व्हेरीफाय 24 +7 हे भाडेकरू,चारिञ्य पडताळणी,पासपोर्ट या कामासाठी सहाय्यभूत ठरणारे साफ्टवेअर शहर पोलीस दलाच्या सेवेत दाखल करण्याचा पोलीस आयुक्तांचा मानस स्तुत्य आहे.विशेषतः पोलीस आयुक्तालयातील सर्व गस्ती वाहनांना जीपीएस प्रणालीने जोडण्याचा आयुक्तांचा निर्णय स्वागतार्ह म्हणायला हवा.
शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावते आहे.अन्य विभागांसह नाशिककरांप्रमाणे या प्रवासात पोलीस आयुक्तालयानेही आपले योगदान दिले तर हा प्रवास सोपा होईल.याची जाणीव असलेले पोलीस आयुक्त डा.रविंद्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त म्हणून आवश्यक तेव्हढे योगदान तर देत आहेतच पण शासकीय संहीतेच्या पलिकडे जाऊन स्वतः नाशिककर आहोत या भावनेतून समाजाला बरोबर नेण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्तालयाची प्रतिष्ठा आणि नाशिककरांचे आयुक्तांशी जुळलेले ऋणानुबंध आयुक्तालयाची कार्यक्षमता वाढविण्यास कारणीभूत ठरले आहे.

तथापी शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या काही प्रवृत्ती आपल्या पुर्व खाकी मानसिकतेतून बाहेर पडण्यास तयार नसल्याने सुडाची भावना कर्तव्यात प्रातिबिंबीत होताना दिसत आहे.शहरात अवैध धंद्यांचा वाढता प्रभाव अनेक गुन्हेगारी प्रकारांना चालना देत आहे हे माहीत असूनही त्या धंद्यावर विशेष मेहेरबानी दाखविणारा एक गट पोलीस आयुक्तालयात कार्यरत असल्याने पोलीस ठाण्याचे कलेक्टर,शहरातील अवैध धंदे चालक यांची उठबस आणि या अभद्र युतीच्या अमिषाला बळी पडलेले काही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संगनमतामुळे कधी काळी उध्वस्त केलेले अवैध धंदे पुन्हा आहे तिथेच जोमाने पुर्ववत झाल्याचे दिसते.या अनेक धंद्यांशी शहरातील काही राजकीय पुढार्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याने राजकीय किंवा सामाजिक आंदोलनेही या अवैध धंद्यांविरूध्द होतांना दिसत नाहीत.पञकारांनी या धंद्यांविरूध्द विचारणा केलीच तर या धंद्यांशी संबंधीत सर्वांचाच दुखावलेला अहंकार पञकारांना लक्ष्य करतो.खोट्या प्रकरणांशी संबंध जोडून पञकारांना बदनाम करून कर्तव्यापासून परावृत्त केले जाते.स्थानिक पोलीस ठाण्यातील विशेषतः अवैध धंद्यांचे कलेक्शन करणारे कलेक्टर कायद्याची भीड बाळगणार्या मंडळींना लक्ष्य करतात.

अशा काही घटनांमुळे पोलीस आयुक्तांनी साफसफाईची मोहीम राबहून चर्चेत असलेल्या अशा चेहर्यांना साईड ट्रक दाखविला होता.तथापी काही पोहचलेल्या मंडळींनी त्यावरही मात करून बदलीची कारवाई रोखली.पंचवटी पोलीस ठाण्यातील एका कलेक्टर्सची रद्द झालेली बदली उदाहरण म्हणून चर्चेत आहे.अशा प्रवृत्तींमुळे उध्वस्त झालेले स्पा,अवैध जुगार अड्डे,मटक्मच्या पेढ्या,रोलेट,अवैध दारू विक्री,गांजा ,अफू,चरस या सारख्या अंमली पदार्थांची शहरात रेलचेल दिसते.किंबहूना तीन कोटी रूपयांच्या सुटकेसचे प्रकरण शहरात चांगलेच गाजले.या प्रकरणातील सत्य पोलीस आयुक्तांपासून दडवून ठेवण्यात संबंधितांना यश आल्याने तीन कोटी सापडले पण कुणीच नाही पाहीले असे म्हणण्याची वेळ खुद्द पोलीस आयुक्तांवर आली.तरीही ती बग कुणाची? बगेत असलेले पैसे कुणाचे? कोट्यवधी रूपये आहेत हैहे सांगणारा वेटर कोण? तो कुठे आहे? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तै पैसे कुठे गेले? या प्रश्‍नांची उत्तरे अद्यापही न मिळाल्याने तीन कोटीचे गुढ डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच एका बाजूला पोलीस आयुक्त खाकी वर्दीच्या आत असलेला माणूस मरू न देता स्मार्ट सिटीच्या मार्गावर आपल्या कर्तव्यनिष्ठ सहकार्यांसह धावत असतांना पोलीस आयुक्तालयातील काही मंडळी कर्तव्याशी प्रतारणा करून पोलीस आयुक्तांच्या मार्गात गतीरोधक उभे करीत आहेत.सेनापती पराक्रमी,धोरणी आणि दुरदृष्टीचा असला तरी सैन्य एकनिष्ठ असेल तरच रणांगणावर विजयश्री खेचता येते.हे नाकारता येणार नाही म्हणूनच पोलीस आयुक्तांनी उर्वरीत कार्यकालात या घरभेद्यांच्या कारवायांवर नजर ठेवून नाशिककरांना कायदा सुव्यवस्थेचे खरेखुरे स्वास्थ बहाल करावे.हा लेखाजोखा मांडत असतांना अनेक हितसंबंधीतांचा अहंकार दुखावला जाण्याची शक्यता आहे.हा दुखावलेला अहंकार डुख धरणार,दंश करणार याची जाणीव आहे.तरीही पोलीस आयुक्त डा.रविंद्र कुमार सिंगल आणि त्यांचे कर्तव्य निष्ठ पोलीस उपायुक्त,सहाय्यक पोलीस आयुक्त,पोलीस निरीक्षक,सहा.पोलीस निरिक्षक,पीएसआय,ठाणे अंमलदार आणि तमाम पोलीस कर्मचार्यांच्या कर्तृत्वाला सलामी म्हणून हे धाडस करीत आहोत.