अंमली पदार्थ विक्री प्रकरणी आरती मिसाळ टोळीतील 9 जणांवर मोक्का
पुणे : अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी पुण्यातील खडक, पिंपरी आणि वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या आरती मिसाळ टोळीतील पाच महिला आणि चार पुरूषांसह 9 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. यातील सात जणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले होते. त्यांच्या ताब्यातून 100 ग्रॅम ब्राऊन शुगर, अडीच किलो चरस असे सहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
आरती महादेव मिसाळ, पूजा महादेव मिसाळ, निलोफर हयात शेख, रॉकिसिंग जालिंदरसिंग कल्याणी (सर्व राहणार, रामटेकडी, हडपसर, पुणे), अजहर उर्फ चुहा हयात शेख (रा.हरकानगर, पुणे), गोपीनाथ नवनाथ मिसाळ आणि जाकू क्लब सैय्यदअली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आयेशा उर्फ आशाबाई पापा शेख, जुलैखाबी पापा शेख (रा.सांताक्रुझ, मुंबई) या दोघी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी 18 डिसेंबर रोजी अजहर उर्फ चुहा हयात शेख याला अटक केली होती. उर्वरीत आरोपींचा शोध सुरू असताना नगर रोड-वाघोली भागात स्विफ्ट गाडीतून फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
पोलिसांनी चौकशी करून त्यांच्या ताब्यातून हेरॉईन आणि चरस जप्त केले. वर नमूद केलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी आजूबाजूच्या परिसरात टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गुंडगिरी व दहशतीचा वापर करून अंमली पदार्थ विक्रीचे गंभीर गुन्हे केले आहेत. या सर्व आरोपींविरूद्ध मोका कायदा अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिला होता. त्यानुसार या सर्व आरोपीवरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.