Breaking News

दरोड्याच्या तयारीत असलेले संशयित जेरबंद


संगमनेर/प्रतिनिधी :- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित आरोपींना पोलिसांनी काल {दि. २९} पहाटे शहर पोलिस ठाण्याच्या गस्तीपथकाने जेरबंद केले. एकजण घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चारही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या चौघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 
शहर पोलिस ठाण्याचे पथक काल {दि. २९} पहाटे गस्त घालत होते. नाशिक-पुणे बाह्यवळण रस्त्यावर हे पथक गेले असता या पथकाला अकोलेकडे जाणाऱ्या पुलाखाली काहीजण दुचाकी घेऊन संशयितरित्या अंधारात उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून पोलिसांना लोखंडी कटावणी, चाकू, स्क्रू डायव्हर, मिरचीची पूड, दोरी आदी साहित्य मिळून आले. याप्रकरणी पोलिस कॉन्सटेबल गोरक्ष शेरकर यांनी फिर्याद दिली. 

निलेश राजेंद्र काथे ( रा. इंदिरानगर), धिरज राजेंद्र पावडे ( रा. वडारवस्ती, क्रिडा संकुलामागे), प्रतिक अनुपम वाकचौरे ( रा. गोविंदनगर), राजन दत्तात्रय हातकर (रा. साईश्रध्दा चौक) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी संगमनेरातील आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सी. आर. गावंडे करित आहेत.