Breaking News

चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय बँकांनी ६७०० कोटी केले वसूल.


श्रीगोंदा /प्रतिनिधी /- देशातील राष्ट्रीय बँकानी चालू वर्षी खात्यावर किमान शिल्लक नसणाऱ्या खातेदारांकडून सुमारे ३२०० कोटी आणि अधिभारातून ३५०० कोटी असे वर्षात ६७०० कोटी वसूल करून बँक खातेदारांची जबरदस्त लुट केलेली आहे. उद्योगपतीला कोट्यावधी रुपयांची कर्ज माफी करणाऱ्या या बँका सामान्य खातेदारांकडून कोट्यावधी रुपये लुटतात , ही लुट थांबली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर यांनी केली आहे.
प्रा. दरेकर म्हणाले की , एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या आठ महिन्याच्या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडियाने १७७२ कोटी, पंजाब नॅशनल बँकेने ९७ कोटी, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने ६९ कोटी, कॅनरा बँकेने ६२ कोटी, आयडीबीआय बँकेने ५२ कोटी, इंडियन बँकेने ५१ कोटी व युनियन बँकेने ३३ कोटी असे एकूण २ हजार १३६ कोटी रुपये किमान शिल्लक नसल्याचा दंड खातेदारांकडून वसूल केलेला आहे. म्हणजे हा दंड वर्षाला ३ हजार २०० कोटी पर्यंत वसूल होणार आहे.

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात देशातील राष्ट्रीय बँका ३ हजार ५०० कोटी रुपयाचा अधिभार वसूल करीत आहेत. किमान शिल्लक असणाऱ्या खातेदारांच्या खात्यावरील शिल्लक दंड आकारणीतून शून्य झाली तरी दंडाची आकारणी खात्यावर मायनस पद्धतीने चालू राहते व बँक खात्यात शिल्लक येताच ती वजावट करून वसूल केली जाते, परंतु खातेदारांकडून सोडली जात नाही. उद्योगपतींना दिलेली कर्ज राईटऑफ करणा-या या बँका सामान्य खातेदारांकडून कोट्यावधी रुपये वसूल करतात, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे. लोक प्रतिनिधींनी विधिमंडळात आणि संसदेत हा विषय मांडून सामान्य ग्राहकांची यामधून सुटका केली पाहिजे. बचत खात्यावर ४ टक्के व्याजदर देणाऱ्या या बँकांनी शून्य शिल्ल्केवरच खाती चालविली पाहिजेत.