पानसरे हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. जून 2016 मध्ये तावडे याला पोलिसांनी अटक केली होती. पण नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणामध्येही तावडे संशयित आरोपी असल्यामुळे सध्या तावडे हा सीबीआयच्या कोठडीत पुण्यामध्ये आहे त्यामुळे जरी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी तावडे अजूनही कोठडीतच राहणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं 25 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला असून कोल्हापूरमध्ये येण्यास तावडेला मज्जाव करण्यात आला आहे. आरोपी तावडेला दर शनिवारी एसआयटीकडे हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत, त्याचबरोबर पासपोर्ट जमा करून राज्य सोडून बाहेर न जाण्याचे आदेशही कोल्हापूरच्या न्यायालयानं दिलेत. दरम्यान तावडेच्या जामीनावर पुन्हा एकदा तपास यंत्रणांना हा धक्का मानला जातोय. कारण यापूर्वी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड यालाही जामीन मंजूर झाला होता.