Breaking News

त्या’ दुकानदारावर नवीन विधेयकानुसार गुन्हा दाखल करा सामाजिक कार्यकर्ते भुसारी यांची मागणी


अहमदनगर प्रतिनिधी : -काळ्या पैशांच्या जोरावर आर्थिक ‘गडबड’ करणाऱ्या आणि नोटबंदीच्या काळात अनेकांच्या बँक खात्यांवर करोडो रुपयांची रक्कम टाकत अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या ‘त्या’ दुकानदारावर नवीन विधेयकानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव भुसारी यांनी ‘दै. लोकमंथन’शी बोलताना केली.
भुसारी यांनी सांगितले, की या दुकानदाराने नोटबंदीच्या काळात भेंड्याच्या एका मल्टीस्टेट बँकेतून दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तब्बल २५ लाख रुपये बदलून घेतले. विशेष म्हणजे हा दुकानदार दुसऱ्या दिवशीदेखील २५ लाख रुपये नोटा बदलविण्याची सदर बँकेत घेऊन गेला. मात्र या बँकेच्या अधिकार्यांनी असमर्थता दर्शविली. या काळात सोनईच्या मुख्य पेठेतील या ‘भाऊ’ने अनेकांच्या बँक खात्यावर अडीच ते तीन लाख रुपये भरून थोडे थोडे काढून घेतले. या दुकानदाराने त्याच्या दुकानातील जवळपास सर्वच कामगारांना त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचे विचारले होते. मात्र यातील निम्म्याहून कामगारांनी नकार दर्शविला. परंतु, उर्वरित कामगारांच्या बँक खात्यावर पैसे टाकण्यात आले आहेत. ज्या कामगारांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले, त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी जे दोन कामगार पुढे करण्यात आले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणेकडे आमचा पाठपुरावा सुरु आहे. या कामगारांपैकी अनेकांना या गैरकृत्याच्या परिणामांची माहिती नाही. या कामगारांविषयी आमच्या मनात कुठलीही कटूता नाही. मात्र या दुकानदाराने नाहक निष्पाप या कामगारांचा बळी देण्याचा जो ‘उपद्व्याप’ केला आहे, तो चव्हाट्यावर आणण्यासाठी आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहोत.

या दुकानदाराने कांगोणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचा सर्व खर्च केला असल्याची वदंता आहे. राजकीय नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या खात्यावर पैसे टाकून या दुकानदाराने ‘कपटी’ खेळी खेळविली आहे. मात्र या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आम्हला कोणी कितीही ‘आमिष’ दाखविले किंवा धमकी दिली, तरी त्यास आम्ही अजिबात भीक घालणार नाही. कांगोणीचा कर्डिले आडनाव असलेल्या वाहनचालकाला या दुकानदाराने ‘भूमिगत’ होण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सत्य उजेडात यायला लागल्याने या दुकानदाराच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. या प्रकरणाची पोलीसांनी सक्षम यंत्रणेमार्फत निःपक्षपाती चौकशी करावी. ‘काळ्या पैसाविरोधी विधेयक- २०१६’ या नव्या विधेयकानुसार या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा. अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण आणि अन्य आंदोलन केले जाईल.