उद्योगांना पायाभूत सुविधा पुरविण्यात महाराष्ट्र अग्रेसर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 जागतिक परिषदेविषयी माहिती देण्यासाठी येथील हॉटेल ताज मानसिंग मध्ये आयोजित विविध कंपन्यांचे मुख्यकार्यकारी अधिकारी व राजदूतांसोबत राऊँड टेबल बैठकीत श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई,शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेसी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्याने गेल्या तीन वर्षात औद्योगिक क्षेत्रात अग्रस्थान मिळविले आहे. देशाच्या एकूण परकीय गुंतवणूकीपैकी 50 टक्के परकीय गुंतवणूक राज्यात झाली आहे. उद्योगांसाठी लागणारी पायाभूत सुविधा तसेच निर्यात आणि वित्त क्षेत्रातही राज्य आघाडीवर आहे. राज्याचा विकासदर दुहेरी आकड्यात आहे. अर्थव्यवस्थेची हिच गती कायम ठेवत येत्या 7-8 वर्षात राज्याला देशातील ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविणार असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.‘मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद 2018’ यासाठी पुरक ठरेल असा विश्वास व्यक्त करत श्री. फडणवीस यांनी देश-विदेशातील गुंतवणूकदारांना मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
राज्यात 2016 मध्ये मेक इन महाराष्ट्र ही जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राज्य शासनाचे सर्व विभाग मिळून 8 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. यातील 51 टक्के प्रकल्प हे प्रत्यक्ष कार्यरत आहेत. प्रस्तावित गुंतवणूकीच्या 61 टक्के प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे. यातून अपेक्षित रोजगार निर्मिती पैकी 74 टक्के रोजगार निर्माण झाले असल्याची माहितीही श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.
दिनांक 18 ते 20 फेब्रुवारी 2018 दरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन 2018’ या जागतिक गुंतवणूक परिषदेत राज्याची उद्योग क्षेत्रातील भरारी, उद्योग क्षेत्रासाठी असलेले पूरक वातावरण औद्योगिक वृद्धी मध्ये असलेले राज्याचे योगदान व या दिशेने राज्याची असलेली तयारी दर्शविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विविध कंपन्यांचे मुख्यकार्यकारी अधिकारी व राजदूतांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री यांनी समर्पक उत्तरे दिली.
