Breaking News

प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने साजरा!


पाथर्डी/शहर प्रतिनिधी/- पाथर्डी शहरातील, जिल्हा परिषदेच्या उर्दु शाळेने ध्वजवंदनाबरोबरच अनोख्या पद्धतीने विविध उपक्रम साजरे केल्याने या शाळेविषयी असलेल्या गैरसमजांना काही एक अर्थ नसल्याचे निदर्शनास आले.२६ जानेवारीला सकाळी सात वाजता लेक वाचवा, झाडे जगवा याबरोबरच स्वच्छतेचे महत्व उद्धृत करणाऱ्या फलकांसह प्रभातफेरी निघाली. त्यानंतर हाजी मिठ्ठूभाई शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजेंद्र देवढे, चाँद मणियार, नासिरभाई शेख, हाजी शकीलभाई बागवान, जुनेद पठाण, रवी भंडारी, अमिर शेख, अन्वर आतार, मुनिर बागवान, रउफ बागवान, मौलाना शफिक आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजगीतांनंतर सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा, या गीतावर विद्यार्थ्यांनी केलेले प्रात्यक्षिक नजरेत भरणारे होते. हुंडा पद्धतीविरुद्ध सादर केलेली नाटिका तर लाजवाब होती. यानंतर सुमारे ८०% विद्यार्थ्यांनी केलेली अस्खलीत इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील भाषणे थक्क करणारी होती.

बालवाडीच्या वर्गाचे उद्घाटन पत्रकार राजेंद्र देवढे यांच्या हस्ते फ़ीत कापून झाले. त्याचबरोबर सर्व मुस्लीम बांधवांनी वर्गणी करुन बालवाडीतील मुलांना ने-आण करण्यासाठी रिक्षा भेट दिली. बालवाडीतील विद्यार्थ्यांच्या पुस्तकांसह जो काही खर्च येणार आहे, तोसुद्धा वर्गणीतूनच करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख यांनी दिली. नगरसेवक अनिल बोरुडे यांनी मुलामुलींना इंग्रजीतून अनेक शब्दार्थ विचारले. प्रश्नही विचारले. त्याला विद्यार्थ्यांनी दिलेली समर्पक उत्तरे ऐकून ते सुद्धा आश्चर्यचकीत झाले. सर्वच बाबतीत शाळेची प्रगती होत असतानाही पटसंख्या समाधानकारक नसल्याने या शाळेतील काही शिक्षक इतरत्र वर्ग करण्यात आले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांकडे इतर समाजांप्रमाणे मुस्लीम समाजाचाही ओढा अधिक असल्याचे जाणवते. परंतु यावर लवकरच उपाययोजना करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चाँद मणियार यांनी दिली.