राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणामध्ये वर्षभरात ६४९ तक्रारी दाखल, १९६ निकाली - माजी न्यायमूर्ती आनंद पोतदार
पोलीस तक्रार प्राधिकरणाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पोतदार बोलत होते. यावेळी प्राधिकरणाचे सदस्य सेवानिवृत्त अपर पोलीस महानिरीक्षक प्रेमकृष्ण जैन, उमाकांत मिटकर, सदस्य सचिव राजेंद्र सिंह, प्रशासकीय अधिकारी प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते.
श्री. पोतदार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झाली असून नागरिकांना पोलीस दलातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविरुद्ध या प्राधिकरणाकडे दाद मागता येणार आहे. पोलीस कोठडीतील मृत्यू, पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून पदाचा गैरवापर होणे, पोलीस स्थानकात तक्रार दाखल न करून घेणे, गंभीर दुखापत करणे, बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न, विहित कार्यपद्धती न अनुसरता केलेली अटक किंवा स्थानबद्धता, खंडणी उकळणे, जमीन अथवा घर बळकावणे, कायद्याचे उल्लंघन आदी विविध विषयांसंबंधी पोलीसांविरुद्धच्या तक्रारी या प्राधिकरणाकडे करता येतात. तक्रारदारांनी लेखी अर्ज करून सोबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
