Breaking News

कोकण रेल्वेतील भरती प्रक्रिया यापुढे अधिक पारदर्शक - नंदू तेलंग

रत्नागिरी, दि. 31, जानेवारी - कोकण रेल्वेची भरती प्रक्रिया यापुढे अधिक पारदर्शक करण्यासाठी यापुढे सर्व भरती प्रक्रिया या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी ही माहिती दिली.


एकीकडे कोकण रेल्वेत नोकर्‍यांसाठी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याची तक्रार होत आहे. ती खोडून काढत कोकण रेल्वेतील निम्म्याहून अधिक कर्मचारी प्रकल्पग्रस्त असल्याची माहिती श्री. तेलंग यांनी दिली. येत्या एप्रिलपासूनची कोकण रेल्वेची सर्वभरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. कोकण रेल्वेत आतापर्यंत 53 टक्के प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

कोकण रेल्वेची भरती प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप झाला होता. त्यामुळेच कोकण रेल्वेने पत्रकार परिषद घेत भरती प्रक्रियेची माहिती दिली. दोन महिन्यांत कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत याचा अवलंब केला जाणार आहे. तसेच कोकण रेल्वेच्या लेखी परिक्षेतील गुण जाहीर केले जाणार आहेत. डिसेंबर 2017 पर्यंत कोकण रेल्वेत 5 हजार 195 क र्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. एकूण कर्मचार्‍यांपैकी 2 हजार 803 प्रकल्पग्रस्त आहेत. त्यापैकी 53 टक्के महाराष्ट्रातील, 36 टक्के कर्नाटक, तर 11 टक्के गोवा राज्यातील आहेत. या आकडेवारीवरून कोकण रेल्वेने नोकरीमध्ये प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतल्याचे दिसून येत असल्याचे तेलंग यांनी स्पष्ट केले. 
प्रकल्पग्रस्तांमधून कुशल कामगार मिळत नाहीत. त्यामुळे सुपरवायझर आणि एक्झिक्युटिव्ह या पदांवर प्रकल्पग्रस्त नेमले जात नाहीत. प्राथमिक परीक्षेत प्रकल्पग्रस्त उत्तीर्ण होतात. परंतु सहाय्यक लोकोपायलट आणि सहाय्यक स्टेशन मास्तर या पदांसाठी होणार्‍या पुढील परीक्षेत ते अपयशी ठरतात. प्रकल्पग्रस्तांकडून या परीक्षेसाठी प्रशासन पूर्वतयारी करून घेते, असेही तेलंग यांनी सांगितले.