Breaking News

नगर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामास लवकरच प्रारंभ


मिरजगाव/प्रतिनिधी / - नगर- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामास लवकरच सुरूवात होणार असुन, या साठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग मंत्रालयाने जमीन संपादित करण्यासाठी नोटिस दिली आहे. या बाबत ज्या शेतक-यांच्या किंवा अन्य कोणाच्या खाजगी जमिनी आहेत. त्यांना कर्जत येथील प्रांताधिकारी यांच्या कडे हरकती घेण्यास सांगण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. 
या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कर्जत तालुक्यातील मांदळी ते चापडगाव परीसरातील शेतजमिनी या महामार्ग रुंदीकरणात जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असुन शासनाकडुन या महामार्गाचा नकाशा प्रसिद्ध झाला आहे, या शेतजमिनी ताब्यात घेण्यासाठी तसे नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध केले आहे. 21 दिवसात यावर हरकती.घ्यायच्या आहेत, त्यामुळे नगर (चांदनी चौक) ते चापडगाव परीसरातील महामार्गलगतच्या शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. 

महामार्गाच्या चौपदरी करणासाठी कर्जत तालुक्यातील मांदळी, मिरजगाव, थेरगाव, नागमठाम, घुमरी, बेलगाव, कोकणगाव, बाभुळगाव, नागलवाडी, माही, जळगाव, पाटेगाव, पाटेवाडी, निमगावडाकु, चापडगाव या 15. गावांचा समावेश आहे, या गावातील रस्त्यालगत येणा-या 15 लाख 46 हजार 8 चौरस मीटर परिसर अधिग्रहीत करण्यात येणार आहे. 

यामध्ये शेतक-यांची सरकारी जमिन व बिगरशेती झालेल्या जमिनींचा समावेश करण्यात आला आहे. सरकारचे राजपत्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावर 24. नोव्हेंबर तारीख असुन जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 516 ए च्या 38.350 कि मी ते 80,600 कि मी भूखंडाचा यामध्ये समावेश आहे. हा सर्व भूखंड कर्जत तालुक्यातील असुन याची लांबी 42 किलोमीटर आहे. या रस्त्याचे नाव नगर - करमाळा, टेंभूर्णी असे आहे. या रोडवर ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांचे गट नंबर देखील प्रसिद्ध केलेले आहे. या परीसरात बागायती जमिनी असुन शेतक-यांमध्ये खळबळ उडाली आहे. कोकणगाव ते मिरजगावच्या बाहेरील बाजुस पुर्वीचा मार्ग होता. मिरजगाव पासुन नगरकडे 2.6 किलोमीटर अंतरावर नविन महामार्गाचे सर्वेक्षण करण्यात येत 7 आहे. मिरजगाव परीसरातील अनेक शेतक-यांच्या जमिनी या नविन चौपदरी महामार्गात जाणार आहेत. या महामार्गा अंतर्गत जाणा-या जमिनी बहुतांशी बागायती आहेत त्यामुळे या येथील शेतक-यांनी जमिनी अधिग्रहित होण्याची धास्ती घेतलेली दिसत आहे. त्यातच शासनाकडुन नेमकी किती व कशी नुकसान भरपाई मिळणार? या विषयी अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. महामार्ग बाहेरून जाणार की आहे त्याच मार्गाचे रूंदीकरण होणार होणार? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. महामार्गावरील वाहतुक बाहेरून वळविली गेली तर मिरजगावची अगोदरच ढासळलेली बाजारपेठ आणखीनच उध्वस्त होणार यात मात्र शंका नाही.