नाचता येईना आंगण वाकडे ? पाथर्डी नगरपालिकेतील सध्याची परिस्थिती
पाथर्डी/शहर प्रतिनिधी।२३/- गेल्या आठवडाभरचा पालिकेतील घटनाक्रम पाहता, नाचता येईना आंगण वाकडे अशीच गत सत्ताधाऱ्यांची झालेली दिसून येते. अशीच काहिशी परिस्थिती पाथर्डी नगरपालिकेत सध्या पाहावयास मिळत आहे. विकासाचा मोठा गाजावाजा केला जातोय परंतु तो तर दुर्बिण लावूनही दृष्टीपथात देखील दिसून येत नाही. महामाता पुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करताना दुजाभाव दाखविला जात असल्याने परस्परविरोधी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक प्रदूषण वाढीस लागले आहे. अच्छे दिनाची ही नवी व्याख्या असावी. असे समजत सर्वसामान्य नागरिक, पालिकेत चाललेला हा हैदोस मुकाटपणे सोसत आहेत.
शहरवासियांनी मोठ्या विश्वासाने भाजपाच्या पारड्यात बहुमताचे दान टाकले. ते यामुळेच की, नगराध्यक्षांचा न खुपणारा सालस चेहरा आणि नगरसेवक पदासाठी भाजपाला लाभलेले आश्वासक उमेद्वार व नेतृत्व. ज्यामुळे गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असल्याने शहराचा सर्वांगीण विकास होईल.असा पाथर्डीकरांचा यामागील कयास होता. परंतु जनतेच्या भोळ्या-भाबड्या अपेक्षांना मात्र अपेक्षाभंगाचा दारुण अनुभव येत आहे. विकासकामे राहिली दूरच परंतु अंतर्गत हेव्यादाव्यांनी सत्ताधाऱ्यांत विसंगती वाढीस लागली असून, एखादा अपवाद वगळता विरोधी पक्षही बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्या अशा अंतर्गत कुरघोड्यांमुळे मात्र पक्षाच्या प्रतिमेला ओहटी लागली आहे.
अभ्यासू युवा नेतृत्व अशी ज्यांची अल्पावधीत जनमाणसांत ओळख निर्माण झाली आहे, त्या नगरसेवक प्रसाद आव्हाडांनी व्यक्त केलेली खंत म्हणूनच बोलकी व विचार करायला भाग पाडणारी आहे. आंदोलने सुद्धा मॅनेज केली जातात, हा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा आंदोलनांच्या व आंदोलकांच्या विश्वासार्हतेवर घाव घालणारा आहे. आंदोलनांचा तालुका म्हणून पाथर्डी तालुक्याची ओळख आहे. ही परंपरा जोपासत तालुक्याने आपली ओळख आजवर जपली असली तरी आंदोलनांच्या हेतूवरच शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्याने ही ओळख काहीशी संभ्रमीत होऊ लागली आहे.
शहरात, खास करुन उपनगरांत पायाभूत सुविधांविषयी च्या समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यात प्रामुख्याने काही भागांतील गटारांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. विजयनगर या उपनगरातील सिमेंटचा मुख्य रस्ता जागजागी उखडला असून पाणी सुटल्यानंतर या खड्ड्यांचे डबक्यात रुपांतर होते. परिणामी ये- जा करणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडते. तसेच जास्तीचे पाणी सखल भागातील इमारती भोवती साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सोबतीला डुकरांचे कळप तर आहेतच. यामुळे अशा भागांतील रहिवाशांना जगणे असह्य झाले आहे. सर्वसाधारणपणे जवळपास सर्वच उपनगरांतील परिस्थिती काही अंशी अशीच आहे.
मुख्य शहरात वाहतूक कोंडीचा त्रास क्रमशः चालूच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात खड्डे बुजविण्यासाठी टाकलेली अनगड वाळू म्हणजे योजकाच्या डोक्याच्या सुपिकतेचा नमुनाच म्हणावा लागेल. टायरखालून उडणाऱ्या खड्यांनी एखाद्या पांथस्थाचा जीव गेल्याशिवाय कदाचित ही समस्या सुटणार नाही असे दिसते. हाताशी निर्णायक बहुमत, सुसंस्कारी व उच्चशिक्षित नगराध्यक्ष, राज्यात व केंद्रात भाजपाचीच सरकारे, निष्प्रभ व उदासिन विरोधक, एवढे सारे अनुकुल वातावरण असूनही कारभार करता येत नाही. आत्मकेंद्री स्वभावाच्या मुख्याधिकारी एवढा एकमेव अपवाद वगळला तर अंगण सरळ असूनही नाचताच येईना! असेच म्हणने सयुक्तिक ठरेल.