Breaking News

एमआयडीसीतील गीतांजली केमिकलमध्ये स्फोट

जळगाव, - जळगाव येथील एमआयडीसीतील एफ-35 मधील गितांजली केमिकल्स फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट होऊन 9 कामगार गंभीर भाजले गेले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. . या स्फोटाने परिसर हादरला असून एकूण 47 कामगार या कंपनीत कामाला असल्याचे सांगण्यात आले. शेकडो लोकांनी येथे गर्दी करुन कंपनी प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता कोणीही उपस्थित नसल्याच्या संशयावरुन संतप्त भावना उमटल्या.


एमआयडीसीतील गितांजली केमीकल्स फॅक्टरीत अचानक बॉयलरचा स्फोट होऊन रासायनिक द्रवण अंगावर फेकले गेल्याने कर्मचारी गंभीररित्या भाजले गेले आहेत. पूर्णपणे चेहरा होरपळला गेला असून कंपनीचे व्यवस्थापनचे अधिकारी कोणीही जागेवर नसल्यामुळे एमआयडीसीतील इतर कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी या कामगारांना बाहेर काढले.

यातील नऊ कर्मचार्‍यांना गंभीर दुखापत झाली. योगेश प्रकाश नारखेडे, संदीप बोरसे, नीलेश ज्ञानेश्‍वर कोळी, ज्ञानेश्‍वर उखर्डू पाटील, धनराज शालिक ढाके, राजेंद्र उत्तम शिरसाळे, दिनेश शिवशंकर मिश्रा, गणेश साळी, अतुल गजरे हे नऊ कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाच्या आवाजाने एमआयडीसी परिसरासह सुप्रीम कॉलनीत स्फोटाचे हादरे बसले. एक किलोमीटरपर्यंत हे हादरे जाणवले. परिसरात अनेक कंपन्यांमध्ये दगड भिरकले तर काही कंपन्यांचे पत्रे थरथरले. यामुळे त्या कंपन्यांमध्येही घबराट निर्माण झाली होती. भूकंप झाला असल्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आणि त्यामुळे नागरिक घराबाहेर पडले. परंतु नंतर गितांजली कंपनीत स्फोट झाल्याची वार्ता समजल्यावर मोठा जनसमुदाय येथे धडकला. कोणीही कंपनी अधिकारी माहिती देत नसल्याचे चित्र समोर आल्यानंतर जमावाने सुरक्षा रक्षकाच्या कॅबिनवर दगड भिरकावत संताप व्यक्त केला.