Breaking News

सोहराबुद्दीन चकमकीप्रकरणी अमित शाह यांच्या अडचणीत वाढ सीबीआय विरोधांत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल


मुंबई : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सीबीआयविरोधात शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत उच्चन्यायालयानेच सीबीआयच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केल्यामुळे, याप्रकरणांची पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले होते. तसेच त्याची बायको त्यानंतर गायब झाली होती. तिचाही खून केल्याचा आरोप करण्यात येत आहेे. या बनावट चकमकीचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा सहभाग होता, असा आरोप होता. याप्रकरणी सीबीआयने त्यांना जुलै 2010 मध्ये अटकही केली होती. ऑक्टोबरमध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता. डिसेंबर 2014 मध्ये न्यायालयाने अमित शहा यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते.
मात्र मुंबईतील वकिलांच्या एका संघटनेच्या वतीने मुंबई उच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्यामुळे शाह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

सीबीआय ही तपास करणारी यंत्रणा आहे. सीबीआयने याच प्रकरणात राजस्थानमधील पोलीस उपनिरीक्षक हिमांशू सिंह आणि श्याम सिंह चरण तसेच गुजरातचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एन.के. आमिन यांच्याबाबत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले आहे. सीबीआयने एकाच प्रकरणातील आरोपींविरोधात वेगवेगळी भूमिका घेतली. हे अनाकलनिय असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने हा खटला गुजरातमधून मुंबईला हलवण्यात यावा आणि संपूर्ण खटला सुरवातीपासून शेवटपर्यंत एकाच न्यायाधीशाकडून चालवला जावा असे आदेश दिले होते. मात्र याचेही पालन झाले नाही, याकडेही याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले आहे. या याचिकेवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिली.