Breaking News

घराघरातून जिजाऊं जन्माला येण्याची गरज: कडूभाऊ काळे


भेंडा/ प्रतिनिधी / - नेवासा तालुक्यातील भेंडा येथील संत नागेबाबा पतसंस्थे मार्फत वितरित महिला बचत गट कर्ज व पत्रकारांचा सन्मान करतांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र जन्माला यावे असे वाटत असेल तर अगोदर घराघरातून जिजाऊं जन्माला येण्याची गरज असल्याचे वक्तव्य नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी केले.
नागेबाबा पतसंस्थेने आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती, पत्रकादिन व महिला बचत गट कर्ज वितरण कार्यक्रमात कडूभाऊ काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक गणपतराव गव्हाणे होते. ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, तुकाराम मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, पतसंस्थेचे व्यवस्थापक यशवंत नाकाडे , गणेश गव्हाणे व्यासपीठावर उपस्थित होते.

काळे पुढे म्हणाले की पत्रकार घडले-बिघडल्याचे चित्र समाजापुढे ठेवत असतात. ते सामाजिक काम करणार्यांना दिशादर्शक ठरते. नागेबाबा पतसंस्थेचे माध्यमातून महिला सक्षमीकरण केले जात आहे. घेतलेल्या कर्जाची रक्कम योग्य कारणासाठी वापरली जाऊन कर्जाची वेळेत परतफेड केली पाहिजे. कमी खर्चात आरोग्य विमा देण्याचा प्रयत्न आहे. व्यापारी यांचे ही बचत गट निर्माण करून त्यांनाही कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.शेतकर्यांनाही मदत करण्याचा विचार होत आहे.

यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांचे प्रतीमेचे पूजन करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त भेंडा, कुकाणा, हिवरे, रंजनगाव, देवगाव येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. महिला बचत गटांना कर्जाचे वितरण करण्यात आले. प्रा.सविता नवले यांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवनावरील विचार मांडले. पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, अशोकराव मिसाळ, भाऊसाहेब फुलारी, रवींद्र नवले, अजित रसाळ, सुनील दगडे, कारभारी गरड यांनी ही आपले विचार मांडले.

कार्यक्रमासाठी डॉ.शिवाजी शिंदे, गुलाबराव आढागळे, समीर पठाण, आबासाहेब काळे,, महेश बाविस्कर, सुभाष चौधरी, बापूसाहेब नजन, अण्णासाहेब गव्हाणे,राजेंद्र म्हस्के, बापूसाहेब धाडगे, आलीम पठाण, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. शाखाधिकारी साप्ते यांनी स्वागत केले.अवधूत लोहकरे यांनी सूत्रसंचालन केले.बाबासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.